बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याचा बहुप्रतिक्षीत ठरलेला मिशन रानीगंज हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. परंतु, रिलीजपूर्वी चर्चेत ठरलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचं मन जिंकण्यास अपयश आलं आहे. या सिनेमाने आतापर्यंत किरकोळ कमाई केली असून त्याने पाचव्या दिवशी अत्यंत कमी कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे.
एकीकडे अक्षयचा 'ओएमजी 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला. तर, दुसरीकडे त्याचा मिशन रानीगंज हा सिनेमा अपयशी ठरला. त्यामुळे सध्या नेटकरी या दोन्ही सिनेमांची तुलना करत आहेत. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचिनिल्क यांच्या माहितीनुसार, मिशन रानीगंज या सिनेमाने मंगळवारी केवळ १.५० कोटींची कमाई केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, या सिनेमाने आतापर्यंत भारतात १५.६० कोटींची कमाई केली आहे. तर, वर्ल्डवाइडमध्ये त्याने १९.७ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा तब्बल ५५ कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आला होता.
दरम्यान, मिशन रानीगंज या सिनेमाने पहिल्या दिवशी २.८ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ५ कोटी आणि चौथ्या दिवशी १.५० कोटींची कमाई केली आहे.