कलाकार : रितेश देशमुख, जेनिलिया डिसुझा आणि महेश मांजरेकरदिग्दर्शक : शाद अलीनिर्माते : सिवा आनंद आणि शाद अलीकालावधी : दीड तासस्टार - तीन स्टारचित्रपट परीक्षण - अबोली शेलदरकर
लग्न झाल्यानंतर घरातल्या सगळ्यांना जोडप्याकडून गुड न्यूजची अपेक्षा असते. ती मिळाली की, घर आनंदाने भरून जाते. बाळाच्या चाहुलीचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर असतो. मात्र, ही गुड न्यूज पती-पत्नी दोघांकडून मिळाली तर... मग तुमची प्रतिक्रिया काय असेल ? पत्नी गरोदर असू शकते; पण, पती ? कसा काय ? होय, हीच तर कहाणी आहे ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाची. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया डिसुझा हे जोडपं पती-पत्नीच्या भूमिकेत असून, ते दोघेही एकाच वेळेला गरोदर असतात. विचार करा, पती-पत्नी जेव्हा सोबत गरोदर असतील तेव्हा किती धम्माल उडत असेल. चला तर मग बघूयात काय आहे, या चित्रपटाची कहाणी.
कथानक :ही कहाणी आहे अमोल-गुग्लूची. कहाणीला सुरुवात होते तेव्हा लहानपणापासून असलेले मित्र मोठेपणी एकमेकांसोबत लग्नाच्या बंधनात अडकतात. लग्नानंतर अमोल (रितेश देशमुख)ची पत्नी गुग्लू (जेनिलिया डिसुझा) गरोदर राहते. त्याबरोबरच अमोलही गरोदर असल्याचे कळते. तेव्हा पीटी शिक्षक असलेला अमोल जेव्हा गरोदर राहतो तेव्हा त्याची कशी भंबेरी उडते. या चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत महेश मांजरेकर दिसणार आहेत. पुरुष जेव्हा गरोदर राहतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, कोणती धम्माल, मजा येते, हे सर्व पडद्यावर पाहणेच योग्य.
लेखन-दिग्दर्शन :‘झूम बराबर झूम’,‘साथिया’, ‘ओके जानू’ यासारख्या रोमँटिक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक शाद अली यांनी यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय हाताळला आहे. त्यांनी रितेश-जेनिलियासारखी प्रसिद्ध जोडी या चित्रपटासाठी निवडली. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे फॉलोअर्स पाहता चित्रपट हिट होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, कॉमेडी असल्याने प्रेक्षक चित्रपट पाहणारच यात काही शंका नाही. त्याचबरोबर याचे लेखनही शाद अली यांचेच आहे. ९०च्या दशकातील चित्रपट असल्याप्रमाणे त्यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. कधी फॉरेन लोकेशन तर कधी म्युजियम येथे चित्रीकरण याप्रकारे त्यांनी कथानकाला वळण दिले आहे. मात्र, खरेतर याची कथानकाला गरज वाटत नाही.
अभिनय :अभिनयाचा विचार केला तर, रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुजा यांनी अत्यंत उत्कृष्ट अभिनय केला आहे. गरोदर महिलेला काय काय त्रास होतो, हे पुरूष जेव्हा सहन करतो, तेव्हा कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे अत्यंत कॉमेडी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. जेनिलिया तर उत्तम अभिनेत्री आहेच. महेश मांजरेकर हे दिग्दर्शक असण्यासोबत चांगले अभिनेतेही आहेत. त्यामुळे त्यांनी साकारलेला डॉक्टर खुप हसवतो.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, सिनेमॅटोग्राफीनकारात्मक बाजू : कथानक अजून दमदार होऊ शकले असते.थोडक्यात : तुम्ही रितेश-जेनिलियाचे चाहते असाल तर तुम्ही नक्कीच बघावा हा हलकाफुलका चित्रपट.