बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० ला कोलकातामध्ये झाला. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी मिथुन एक नक्षलवादी होते असे म्हटले जाते. पण भावाच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने त्यांना घरी परत यावे लागले. मिथुन यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
मिथुन यांचे अभिनेत्री योगिता बाली यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. योगिता बाली यांचे मिथुन यांच्यासोबत लग्न होण्याआधी अभिनेता किशोर कुमार यांच्यासोबत लग्न झालेले होते. किशोर कुमार यांचे पहिले लग्न रुहा गुमा यांच्यासोबत झाले होते. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. रूमा आणि किशोर कुमार यांच्यातील घटस्फोटानंतर किशोर यांनी अभिनेत्री मधुबाला यांच्यासोबत लग्न केले. पण काहीच वर्षांत मधुबाला यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली आल्या. या दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केलं.
१९७६ मध्ये दोघांनी लग्न केलं त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच यांचा संसार मोडला आणि त्यांनंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं. मिथुन आणि योगिता यांची भेट ख्वाब या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.
योगिता बाली आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या लग्नानंतर किशोर कुमार यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी गाणे बंद केले. मिथुन आणि योगिता यांच्या लग्नाचा किशोर कुमार यांना चांगलाच धक्का बसला होता असे म्हटले जाते. पण त्या दोघांच्या लग्नानंतर काही वर्षांनी सगळे काही विसरून सुरक्षा आणि वक्त की आवाज यांसारख्या चित्रपटांसाठी किशोर यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी गाणी गायली. विशेष म्हणजे वक्त की आवाज या चित्रपटातील गुरू गुरू हे त्यांनी गायलेले शेवटचे गाणे ठरले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशीच त्यांचे निधन झाले.