बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० ला कोलकातामध्ये झाला. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी मिथुन एक नक्षलवादी होते असे म्हटले जाते. पण भावाच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने त्यांना घरी परत यावे लागले. मिथुन यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
मिथुन हे कलाकार म्हणून जितके महान आहेत, तितकेच ते एक व्यक्ती म्हणून देखील चांगले आहेत. मिथुन यांचे अभिनेत्री योगिता बाली यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव दिशानी असून ती अतिशय लहान असताना त्यांना कोलकाता शहराबाहेरील एका कचराकुंडीत सापडली होती. त्यांनी तिला घरी आणले आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवले. तिला त्यांनी कायदेशीररित्या दत्तक देखील घेतले आहे. एवढेच नव्हे तर तिन्ही मुलांइतकाच संपत्तीत वाटा देण्याचे देखील त्यांनी ठरवले आहे.
दिशानी दिसायला खूप सुंदर असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमीच फोटो पोस्ट करत असते. तिने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीत अभिनयाचे धडे गिरवले असून एका शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केले आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जाते.
मिथुन यांना लहानपणापासून डान्सची आवड होती आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी डान्स करून ते पैसे मिळवत असे. डान्ससोबत त्यांना अभिनयाचीही आवड होती. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी ज्युनिअर कलाकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना 'मृगया' या सिनेमात मोठी संधी मिळाली. या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यानंतरही त्याचा स्ट्रगल कमी नाही झाला. त्यांना पुढचे सिनेमे मिळायला बराच वेळ लागला.
1982 मध्ये मिथुन यांच्या 'डिस्को डान्सर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि तेव्हापासून इंडस्ट्रीला एक डिस्को डान्सर मिळाला. खऱ्या अर्थाने या सिनेमामुळे मिथुन लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी केवळ हिंदीच नाही तर बंगाली आणि उडिया भाषेतील सिनेमांमध्ये देखील काम केले.