लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना छातीत दुखत असल्यानं कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिथुन यांची तब्येत बिघडल्याचं समजताच चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. त्यानंतर आता कुटुंबियांनी मिथुन यांच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. स्ट्रोकमुळे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून आयसीयुतून बाहेर आणण्यात आले आहे.
मिथुन चक्रवर्ती यांची सून मदलसा शर्मानं 'मिथुन यांची तब्येत पूर्णपणे बरी आहे. पार्थना आणि काळजीबद्दल चाहत्यांचे आभार', असं म्हटलंय. तसेच मिथुन यांचा थोरला मुलगा मिमोह चक्रवर्ती यानंही वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं सांगितलं. तसेच टाइम्स नाऊशी बोलताना अभिनेत्री देबश्री रॉयने सांगितले की, शनिवारी रात्री मिथुन दा यांची भेट झाली. आता आयसीयूमधून बाहेर असून प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. याशिवाय दिग्दर्शक पथिकृत बसू यांनीही मिथुन चक्रवर्ती यांची रुग्णालयात भेट घेतली.
मिथुन चक्रवर्ती सध्या पूर्णपणे शुद्धीत आहेत आणि हलका आहारही घेत आहे. त्यांच्यावर न्यूरो-फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टसह डॉक्टरांच्या पथकाद्वारे देखरेख ठेवली जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांना Ischemic Cerebrovascular Accident (स्ट्रोक) आला, ज्याचा संबंध ब्रेनशी आहे. तसेच रुग्णालयाकडून लवकरच त्यांच्या प्रकृतीसंदर्भात हेल्थ बुलेटीन जारी करण्यात येणार आहे.
नुकतेच मिथून चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. पद्म भूषण पुरस्कार जाहीर होताच मिथून चक्रव्रर्ती यांनी आनंद व्यक्त केला होता. तर गेल्या काही दिवसांपासून "शास्त्री" या सिनेमाचं शुटींग देखील मिथून चक्रव्रर्ती करत होते.