रशियाचा हिरो कधी भारतीय होऊ शकतो का? तुम्ही म्हणाल काय संबंध, त्यांची भाषा कोणती, आपली कोणती... पण तुमच्या माहितीसाठी एकेकाळी डिस्को डांसर मिथुन चक्रवर्ती रशियनांचा हिरो होता, त्याच्या शोची एवढी तिकिटे हातोहात खपलेली की मायकेल जॅक्सनही फिका पडेल.
ते १९८३ चे वर्ष होते. मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक बब्बर सुभाष यांच्या 'डिस्को डांसर'ला खास निमंत्रण आले होते. मुंबईतील सोवेक्स फोर्ट या एजन्सीने मध्यस्थाची भूमिका निभावलेली. हा एक मॉडर्न सिनेमा होता. त्याचे संगीतही नव्या काळाचे होते. तेव्हा 'दो बीघा जमीन' सारखे सिनेमे चालायचे. परंतू डिस्को डान्सर हा असा सिनेमा बनला ज्याने भारतीय भाषेचा लवलेशही नसलेल्या देशात अक्षरश: थैमान घातले होते.
डिस्को डान्सरचा शो पाहण्यासाठी सोव्हिएत संघामध्ये १२ कोटी तिकिटे विकली गेली होती. व्हॉट्सअपच्या युक्रेनी सहसंस्थापकाने सांगितले होते, की त्याने हा सिनेमा लहानपणी कीव्हमध्ये २० वेळा पाहिला होता. या प्रकाराला आणखी एक कारण असे होते ते म्हणजे शीत युद्ध. तेव्हा हॉलिवूडच्या सिनेमांवर सोव्हिएतमध्ये बंदी होती. १९५० पासून सोव्हिएतने भारतीय सिनेमांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. पहिली हिट फिल्म राज कपूर यांची 'आवारा' होती. या सिनेमाची ६.४ कोटी तिकिटे विकली गेलेली.
रशियनांसाठी मिथुन हा त्यांचा जिमी होता. 'जिमी जिमी जिमी, आजा आजा आजा', 'आय अॅम अ डिस्को डान्सर' हे गाणे खूप फेमस झाले होते. चाहत्यांची संख्या एवढी होती की १०-१२ वर्षांचा कोवळा पोरगाही या गाण्यावर डान्स करत होता. अॅमस्टरडॅम विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुधा राजगोपालन यांचा अंदाज आहे की 1954 ते 1991 दरम्यान सोव्हिएत चित्रपटगृहांमध्ये 210 भारतीय चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी सुमारे 190 चित्रपट हे मुंबईमध्ये बनलेले हिंदी चित्रपट होते. यानंतर रशियाने एक पाऊल पुढे टाकत भारतासोबत सिनेमे बनविण्यास सुरुवात केलेली. 'अलीबाबा और 40 चोर', 'सोहनी महिवाल' हे त्यापैकीच एक.