अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. अभिनेते मिथुन यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतरांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पद्मभूषण हा सन्मान मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, 'मी आनंदी आहे. कारण मी आयुष्यात कधीही कोणाकडून काही मागितले नाही आणि न मागता काही मिळाले तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो. जेव्हा मला पद्मभूषण पुरस्कार मिळणार असल्याचं कळालं. तेव्हा काही क्षणांसाठी मी स्तब्ध झालो. कारण मला ही अपेक्षा नव्हती. हे स्वीकारायला मला थोडा वेळ लागला', या शब्दा मिथुन चक्रवर्ती यांनी आनंद व्यक्त केला.
मिथुन चक्रवर्ती यांना हा प्रतिष्ठित सन्मान मिळाल्याने त्यांचे चाहतेही खूप आनंदी दिसत आहेत. अभिनेत्याने 1977 मध्ये मृणाल सेन दिग्दर्शित 'मृगया' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूडमधील एव्हरग्रीन चित्रपटांपैकी एक म्हणजे 'डिस्को डान्सर'. 1980 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मिथुन चक्रवर्तींना रातोरात स्टार केलं होतं. अद्यापही ते चित्रपटसृष्टीत सक्रीय आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. यासोबतच ते राजकारणातही सक्रीय आहेत.