‘डिस्को डान्सर’ म्हणून बॉलिवूड प्रेमींमध्ये ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी व अभिनेत्री योगिता बाली आणि त्यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती या दोघा मायलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास सक्ती केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हिंदी व भोजपूरी चित्रपटातील एका अभिनेत्री हे आरोप ठेवले आहेत. पण तूर्तास या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा झालेला नाही. लग्नाचे आमिष दाखवून महाअक्षयने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा या अभिनेत्रीने केला आहे. दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. गत सोमवारी रोहिनी न्यायालयाने यासंदर्भात महाअक्षय व योगिता बालींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.
येत्या ७ जुलैला महाअक्षय व दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मा यांचा विवाह होणार आहे. गत महिन्यात या दोघांचा ‘रोका’ झाला होता. मात्र लग्नाला उणेपुरे पाच दिवस उरले असताना महाअक्षयवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा महाअक्षयच्या नियोजित लग्नावर काय परिणाम होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. २००८मध्ये ‘जिम्मी’ या चित्रपटातून महाअक्षयने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर महाअक्षयचे आणखी चार चित्रपट आलेत. पण तेही आपटलेत.
मदालसा एक अभिनेत्री आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ, जर्मन, पंजाबी अशा अनेक भाषिक चित्रपटांत तिने काम केले आहे. मदालसा लहानपणापासूनच अभिनेत्री बनू इच्छित होती. याला कारणही होते. कारण मदालसाचे आई-वडील हे बॉलिवूड इंडस्ट्रीशी जुळलेले होते. मदालसाच्या पित्याचे नाव सुभाष शर्मा आहे. सुभाष शर्मा एक नामवंत दिग्दर्शक आहेत. मदालसाची आई शीला शर्मा सुद्धा अभिनेत्री आहे . ‘नदिया के पार’, ‘यस बॉस’, ‘घातक’, ‘हम साथ साथ है’ यासारख्या हिट चित्रपटात शीला शर्मा यांनी काम केले आहे. १९९८ मध्ये आलेल्या बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत शीला देवकीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.