Join us

"इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतात..."; पाकिस्तानी कलाकारांविरूद्ध मनसे पुन्हा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 09:29 IST

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे.

Amey Khopkar Post:बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. याआधी पुलवामा याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेनेपाकिस्तानी कलाकार आणि गायकांना भारतात काम करण्याविषयी विरोध केला होता. त्यामुळे पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडपासून दूर आहेत. त्यात आता अभिनेता फवाद खानच्या आगामी सिनेमाची घोषणा झाल्याने या वादाला तोंड फुटले आहे. त्यानंतर आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी पुन्हा एकदा या विषयावर ट्वीट करत बॉलिवूड निर्मात्यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करत असं लिहलंय की, "पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे." अशा शब्दात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान पाकिस्तानी अभिनेता फवाद खान बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.  अलिकडेच त्याच्या 'अबीर गुलाल' या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री वाणी कपूरसोबत तो या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे. सिनेमाचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यावर आता पुन्हा एकदा मनसेकडून इशारा देण्यात आल्याने बॉलिवूडविरोधात मनसेचे 'खळ्ळखट्याक' पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :बॉलिवूडमनसेपाकिस्तानसिनेमा