Join us

‘पीएम नरेंद्र मोदी’तील ११ दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 11:03 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’चे प्रदर्शन थांबवण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि काहीच तासांत सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटाला ‘यू’ सर्टिफिकेट देत पास केले.

ठळक मुद्दे  २ तास १० मिनिटांचा हा चित्रपट उद्या ११ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’चे प्रदर्शन थांबवण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि काहीच तासांत सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटाला ‘यू’ सर्टिफिकेट देत पास केले. पण तत्पूर्वी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ११ कट्स सुचवले असल्याचे कळतेय.ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी केलेल्या टिष्ट्वटनुसार, सेन्सॉर बोर्डाने ‘पीएम नरेंद्र मोदी’मधील ११ दृश्यांना कात्री लावली. तर काही दृश्ये बदलण्याचे आदेश दिलेत.  द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डाने गत आठवड्यात चित्रपट पाहिला आणि यानंतर यातील अनेक दृश्यांवर आक्षेप नोंदवला. चित्रपटातील जातीवाचक संवाद आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर व्यंग साधणारी दृश्ये गाळण्याचे आदेश  सेन्सॉर बोर्डाने दिलेत. चित्रपटात अनेक ‘अ‍ॅण्टीटेरर’ सीन्स होते. ते गाळण्याचेही आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.

  २ तास १० मिनिटांचा हा चित्रपट उद्या ११ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे.  आधी हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. यानंतर ५ एप्रिल चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ऐन रिलीजच्या तोंडावर मेकर्सनी ही तारीख बदलून ११ एप्रिल ही रिलीज डेट निश्चित केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’  हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिमामंडन करणारा चित्रपट आहे, यामुळे मतदार प्रभावित होऊ शकतात, असे या राजकीय पक्षांचे मत आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थात मनसेने या चित्रपटावरून सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी यांचा राजीनामा मागितला होता. निर्माता रिलीज डेटच्या ५८ दिवसांआधी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटाची फायनल कॉपी पाठवतात. अशात ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला कुठल्या आधारावर विशेष वागणूक देण्यात आली? असा सवाल मनसेने उपस्थित केला होता. ‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. विवेक ओबेरॉय यात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय