शास्त्रीय संगीत, गझल, कव्वाली, ठुमरी, भजन, पार्श्वगायन अशा अनेक संगीत शैलीत स्वैर मुशाफिरी करणारा अवलिया मोहम्मद रफी आज आपल्यात नाहीत. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही तुम्हाला त्यांच्याशी आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी सांगणार आहोत.
तुम मुझे यूं भुला ना पाओगे...’ हे रफी यांनी स्वत: गायलेले गीत त्यांच्या आयुष्याला अगदी चपखल लागू पडते. या अवलियाच्या गाण्यांबद्दल सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यांच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. मोहम्मद रफी यांनी दोन लग्न केली होती. पण पहिल्या लग्नाची गोष्ट त्यांनी जगापासून लपवली. या लग्नाबद्दल केवळ त्यांच्या कुटुंबीयांनाच माहिती होती.
या गोष्टीचा खुलासा मोहम्मद रफी यांची सून यास्मिन खालिद रफी यांनी केला. यास्मिनच्या ‘मोहम्मद रफी मेरे अब्बा, एक संस्मरण’ या पुस्तकात रफी यांच्या पहिल्या लग्नाचा उल्लेख आहे. त्यानुसार, रफीचे पहिले लग्न १३ व्या वर्षीचं झाले होते. १३ वर्षांच्या वयात आपल्या काकाची मुलगी बशीरा बानोसोबत रफी यांचे लग्न झाले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. कारण बशीराने रफी यांच्यासोबत भारतात येण्यास नकार दिला. भारत व पाकिस्तान फाळणीदरम्यानच्या दंगलीत बशीराच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. या घटनेने बशीरा इतकी घाबरली होती की, तिने भारतात येण्यास नकार दिला व लाहोरमध्ये राहिली. रफी आपल्या करिअरसाठी मुंबईत आले.
१९४४ मध्ये वयाच्या २० वर्षी रफी यांनी सिराजुद्दीन अहमद बारी आणि तालिमुन्निसा यांची मुलगी बिलकिससोबत दुसरे लग्न केले. रफी यांच्या घरात त्यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेखही व्हायचा नाही. कारण बिलकिस बेगम हिला तिचा उल्लेखही आवडायचा नाही. दुसऱ्या पत्नीपासून बिलकिस यांना खालिद, हामिद व शाहिद हे तीन मुले आणि परवीन, नसरीन व यास्मिन अशा तीन मुली झाल्यात. रफी यांची तिन्ही मुले आज हयात नाहीत.