भोजपुरी सिनेसृष्टीतील लोकप्रिय स्टार्समध्ये अभिनेत्री मोनालिसाच्या नावाचाही समावेश होतो. मोनालिसाने भोजपुरी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. भोजपुरी सिनेमात काम करण्यासोबतच मोनालिसाने टीव्ही मालिकांमध्येही काम करून आपला ठसा उमटवला आहे. पण खरी ओळख तिला भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतूनच मिळाली.
मोनालिसाने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज ती आलिशान आयुष्य जगत आहे. तिच्याकडे सर्व सुख-सुविधा आहेत. ती कोट्यवधींची मालकीण आहे. पण एक काळ असा होता जेव्हा मोनालिसा रात्रंदिवस काम करून १२० रुपये कमवू शकत होती.
मोनालिसाचा जन्म २१ नोव्हेंबर १९८२ रोजी बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास आहे. मोनालिसा १६ वर्षांची असताना एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. त्या बदल्यात तिला फक्त १२० रुपये मिळायचे.
मोनालिसा ही वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये देखील दिसली आहे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर अभिनेत्रीला टीव्ही मालिकांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. मोनालिसाने 'नजर 1' आणि 'नजर 2' या मालिकांमध्ये काम केलं आहे. या शोमध्ये अभिनेत्रीने डायनची भूमिका साकारली जी लोकप्रिय झाली. याशिवाय मोनालिसाने 'बेकाबू' शोमध्येही काम केलं आहे.
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कहां जायबा राजा नजरिया लडाईके' या पहिल्या भोजपुरी चित्रपटातून मोनालिसा स्टार बनली. निरहुआसोबतचा तिचा पहिला भोजपुरी चित्रपट हिट ठरला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. भोजपुरी व्यतिरिक्त, अभिनेत्रीने तेलगू, तमिळ, कन्नड, हिंदी, उडिया आणि बंगाली भाषांमधील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मोनालिसाची एकूण संपत्ती
एकेकाळी हॉटेलमध्ये काम करून १२० रुपये कमावणारी मोनालिसा आज २० कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. मोनालिसा एका भोजपुरी चित्रपटासाठी दहा लाख रुपये मानधन घेते.