'वागळे की दुनिया' या गाजलेल्या टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे अंजन श्रीवास्तव (anjjan srivastav). सध्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकणाऱ्या या अभिनेत्या बॉलिवूडचा ९०चा काळ गाजवला आहे. अंजन यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतकंच कशाला एकेकाळी बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि त्यांची घट्ट मैत्री होती. परंतु, आता या मैत्रीमध्ये वितुष्ट आलं आहे. एका मुलाखतीमध्ये अंजन यांनी याविषयी भाष्य केलं. कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर बिग बींना जुन्या मित्रांचा विसर पडला असं म्हणत त्यांनी अमिताभ यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले अंजन श्रीवास्तव?
"एक काळ असा होता जेव्हा अमितजींची परिस्थिती फारच खराब होती. त्या दिवसांमध्ये त्यांच्या विरोधात अनेक जण कटकारस्थान करत होते. त्यामुळे ते कसे आहेत जे जाणून घेण्यासाठी मी फिल्मिस्तानमधील तुफानच्या सेटवरही गेलो होतो. त्याकाळी कोलकात्यामध्ये अमितजींच्या विरोधात मोठी आंदोलनं सुरु होती. त्यांचे पोस्टर फाडले जात होते, लोक विरोध करत होते. ज्यामुळे अमितजी खूप दु:खी होते. त्यामुळे त्यांना भेटल्यावर कैसे हो भाई? असं विचारलं. ते फक्त ठीक आहे, एवढंच म्हणाले. अलाहाबादचे लेख त्यांच्यावर कडाडून टीका करत होते. त्यांच्या बाजूने कोणीच नव्हतं. त्यामुळे ते फार अस्वस्थ होते. त्यानंतर त्यांचा अपघात झाला. मी दररोज त्यांना भेटायला जायचो. अमितजी माझ्यासाठी चांगले व्यक्ती होते", असं अंजन श्रीवास्तव म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "चुकीच्या बँक स्टेटमेंटमुळे ते एकदा वाईटरित्या अडकले होते. पण, लोक त्यांची फसवणूक करत असल्याचं माझ्या आणि व्यवस्थापकांच्या लक्षात आलं त्यामुळे अमिताभ बच्चन निर्दोष आहेत त्यांना या प्रकरणात ओढले गेले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका, असे मी व्यवस्थापकांना सांगितलं. जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तेव्हा ते लगेच हात जोडून उभे राहिले. मला म्हणाले, मी लवकरात लवकर तुमचे पैसे परत करेन. मी म्हटलं आम्ही पैसे घ्यायला आलो नाहीये. तुमच्या अकाऊटंटच्या चुकीमुळे आम्ही आलो आहोत.तुम्ही सक्षम झाल्यावर पैसे परत करा. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही पैसे द्याल आणि तुमचा हेतू योग्य आहे. परंतु या प्रकारच्या बँकिंगमध्ये इतर बँकांशी व्यवहार करू नका, असं आवर्जुन सांगितलं."
अमिताभ बच्चनला पडला जुन्या मित्रांचा विसर
"अमिताभ बच्चन यांनी गरिबीमध्ये दिवस काढले होते. त्यांची ABCL ही कंपनी मोठ्या तोट्यात गेली होती. पण, कौन बनेगा करोडपती या शोमुळे त्यांचे दिवस फिरले. त्यांनी दणक्यात कलाविश्वात पुन्हा कमबॅक केलं. पण, या कार्यक्रमानंतर ते पूर्णपणे बदलले. त्यांना जुन्या मित्रांचा विसर पडला. केबीसीनंतर अमितजी आणि माझं नातं बिघडलं. पूर्वी त्यांच्या घरी होळी साजरी करण्यासाठी जयाजी मला फोन करुन आमंत्रण द्यायच्या. परंतु, आता हा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या गोष्टीचा माझ्या करिअरवर परिणाम झाला नाही. पण, नुकसान मात्र नक्कीच झालं. मात्र, या सगळ्यामागे कुठे तरी अमितजींना भडकवणारे माझे रंगभूमीवरील मित्रदेखील दोषी आहेत."