मुंबईवरुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका क्रुझवर एनसीबीने धडक कारवाई करत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला आहे. शनिवारी समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये शाहरुख खानचा लेक आर्यन खानदेखील सहभागी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. त्यातच एनसीबीने आर्यनसह ८ जणांना अटक केली आहे. मात्र, ड्रग्स प्रकरणात नाव समोर आल्यानंतरही या आरोपींचे लाड कुटुंबीयांकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं.
'टीव्ही ९मराठी'नुसार, आर्यनसह अटकेत असलेल्या आरोपींसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी चक्क बर्गर आणल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आरोपींवर व त्यांच्या कुटुंबीयांवर कोणताही परिणाम न झाल्याचं म्हटलं जात आहे.
क्रूझ ड्रग्स पार्टी: प्रत्येक व्यक्तीकडून स्वीकारण्यात आलेलं तब्बल इतकं शुल्क
दरम्यान, क्रुझवरील ड्रग्स पार्टीच्या प्रवेशसाठी प्रत्येकाकडून ८० हजार ते ५० लाख रुपयांचं शुल्क आकारण्यात आल्याचं सांगण्यात येतं. दोन हजार प्रवासी संख्या असलेल्या या क्रुझवर एक हजारांपेक्षा कमी लोक उपस्थित होते. तसंच या पार्टीचं निमंत्रण इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये आर्यनसह दिल्लीतील अनेक नामांकित उद्योगपतींच्या मुलांचा सहभाग असल्याचं म्हटलं जातं.