Join us

Mothers Day Special : चित्रपटातून दिसली आईच्या प्रेमाची महती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 6:56 PM

बॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे चित्रपटांचे नाव ‘मदर इंडिया’पासून ‘मॉम’ झाले आहे, त्याच प्रकारे चित्रपटातील आईच्या व्यक्तित्वामध्येही बदल झाला आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांत गेल्या ६२ वर्षात बॉलिवूड चित्रपटांच्या आईने कशाप्रकारे आपल्या व्यक्तित्वात बदल केला आहे.

- रवींद्र मोरे आज संपूर्ण जगात ‘मदर्स डे’ साजरा केला जात आहे. अशावेळी बॉलिवूडच्या आईबाबत चर्चा होणार नाही, हे अशक्य. बॉलिवूड सेलेब्स सकाळपासूनच आपल्या आईसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. बॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे चित्रपटांचे नाव ‘मदर इंडिया’पासून ‘मॉम’ झाले आहे, त्याच प्रकारे चित्रपटातील आईच्या व्यक्तित्वामध्येही बदल झाला आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांत गेल्या ६२ वर्षात बॉलिवूड चित्रपटांच्या आईने कशाप्रकारे आपल्या व्यक्तित्वात बदल केला आहे. काळानुसार चित्रपटात आर्इंचे व्यक्तित्व जरी बदलताना दिसले असले, तरी मात्र आईच्या प्रेमाची महती कमी होताना दिसली नाही हे विशेष.  

* मदर इंडिया (१९५७)हा चित्रपट शक्यतो कोणीही विसरु शकणार नाही. महबूब खान यांच्या दिग्दर्शनात बनलेला या चित्रपटात नर्गिस यांनी लाचार आईची भूमिका साकारली होती, जी आपल्या मुलांसाठी जगाशी सामना करते. या चित्रपटात आईची भूमिका खूपच दु:खदायक होती, जी पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू आले होते. या चित्रपटात एका आईचे आपल्या मुलांप्रती समर्पण प्रेक्षकांना खूपच भावले होते. त्या काळातील प्रेक्षकांनी एका दु:खद आईची भूमिका स्वीकारून चित्रपटास सुपरहिट होण्यास हातभार लावला होता.  

* मां (१९७६)'मदर इंडिया' नंतर आईच्या प्रेमाची महती सांगणारा धर्मेंद्र आणि हेमामालिनीचा ‘मां’ चित्रपट आला होता. १९ वर्षानंतर या चित्रपटात निरुपा रॉयने आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सर्कसचा एक हत्ती या आईला चिरडून टाकतो. तेव्हा धर्मेंद्र आपल्या आईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एकापाठोपाठ सर्कसच्या सर्व प्राण्यांना मारुन टाकतो. या चित्रपटात एक मुलगा आईच्या मृत्यूचा बदला घेताना दाखविला आहे. हा मुलगा खूपच संस्कारी होता.  

 * मां (१९९२)या चित्रपटात आईची भूमिका थोडी अग्रेसिव्ह होती. जया प्रदा या चित्रपटात आईच्या भूमिकेत होती. तसा हा एक हॉरर चित्रपट होता. जया प्रदा एका मुलाला जन्म देताच मृत्यू पावते. नंतर काही गुंड तिच्या मुलाला ठार करु इच्छितात. तेव्हा जया आत्मा बनून आपल्या मुलाचे संरक्षण करताना दिसते. या चित्रपटात नायक जितेंद्र होते. आई आपल्या मुलासाठी बदला घेते आणि त्या गुंडांना ठार करते. यात आईची ममता आणि बदला सोबतच दाखविण्यात आले आहे.  

* जज्बा (२०१५)ऐश्वर्या रायचा कमबॅक चित्रपट 'जज्बा' मध्ये आईची ममता व्यतिरिक्त तिचा राग, बदला आणि शक्ति दाखविण्यात आली आहे. जेव्हा तिच्या मुलीवर संकट येते तेव्हा ती कशाप्रकारे सर्व ताकदीने तिचा बचाव करते, हे दाखविले आहे. यात तिच्या दु:खापेक्षा जास्त तिचे समर्पण आणि तिची ताकद दाखविली आहे. ही आई ऑफिस  पण जाते आणि घरदेखील सांभाळते. सोबतच आपल्या मुलीच्या रक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला सज्ज असते.

* मातृ (२०१७)हा चित्रपट अशा आईची कथा आहे, जिच्या मुलीचा बलात्कार होतो. नंतर तिचा मृत्यूही होतो. मात्र ही आई ना तुटते ना हारते. बस पदोपदी सिस्टमशी लढते आणि आपल्या मुलीच्या अपराध्यांना शिक्षा देत असते. ही एक सशक्त आई आहे. यात रवीना टंडनने या आईची भूमिका साकारली होती. रवीनाने या चित्रपटात एका शक्तिशाली आईची भूमिका साकारून चकित केले होते.  

टॅग्स :मदर्स डे