मौसमी चॅटर्जी यांची मुलगी पायल गेल्या वर्षभरापासून कोमामध्ये आहे. काही महिने रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. सध्या तिच्या घरात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पण कोमात असलेल्या आपल्या मुलीला तिचा पती भेटायला देत नाही असा आरोप करत मौसमी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
पायल सिन्हा आणि डिकी सिन्हा यांचे लग्न २०१० मध्ये झाले. पण त्यानंतर ती प्रचंड आजारी पडली. गेल्या कित्येक वर्षांपासून ती आजारी आहे. २०१७ मध्ये तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासूनच ती कोमात असून सध्या घरातच तिच्यावर उपचार सुरू आहेत. पण पायलला घरी नेण्यात आल्यापासून मौसमी चॅटर्जी आणि तिचे पती जयंत मुखर्जी यांना पायलची भेट जावयाने घेऊन दिली नाही असे त्याचे म्हणणे आहे. पण त्यांचे हे आरोप तथ्यहीन असल्याचे डिकी सिन्हा यांचे म्हणणे आहे. पायलची भेट घेण्यास मी त्यांना कधीही अडवले नसल्याचे डिकी सिन्हा यांनी सांगितले आहे. तसेच मुखर्जी कुटुंबियांकडून ज्या दिवशी याचिका दाखल करण्यात आली, त्या दिवशी देखील त्या दोघांनी पायलची भेट घेतली होती असा दावा डिकी सिन्हा यांनी केला आहे. त्यांनी याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले आहे. एवढेच नव्हे तर यापुढे कधीही त्या दोघांना पायलची भेट घ्यायची असेल त्यावेळी त्यांनी खुशाल घरी यावे असे देखील म्हटले आहे. मी पायलची योग्य प्रकारे काळजी घेतो, तिच्यासाठी मी प्रशिक्षित नर्स देखील ठेवली आहे असे देखील त्यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायलयात मौसमी चॅटर्जी यांनी दाखल केलेल्या प्रकरणावर नुकतीच सुनावणी झाली. दान्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच मौसमी यांना पायलच्या संबंधित असलेले वैद्यकीय कागदपत्रं दाखवली जावीत असा आदेश न्यायालयाने दिला आहे. भविषयात कुठलाही आक्षेप असल्यास पुन्हा एकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकता असे देखील कोर्टात सुनावणीदरम्यान सांगण्यात आले.