मुंबई - 'सिनेमा डे'च्या निमित्ताने रसिकांनी केवळ ९९ रुपयांमध्ये सिनेमा पाहिल्यानंतर आता पीव्हीआर-आयनॅाक्सने रसिकांसाठी त्याहीपेक्षा भन्नाट ऑफर आणली आहे. या अंतर्गत सिनेप्रेमींना केवळ ६९९ रुपयांमध्ये १० चित्रपट म्हणजेच अवघ्या ६९.९० रुपयांमध्ये एक चित्रपट पाहता येणार आहे.
पितृपक्ष आणि नवरात्रीमुळे सध्या सिनेमागृहांकडे रसिकांचा ओढा फार कमी झाला आहे. त्यामुळे नवनवीन योजना राबवून प्रेक्षकांना आकर्षित केले जात आहे. अशा हंगामी योजनांना छेद देत पीव्हीआर-आयनॅाक्सने थेट 'पीव्हीआर-आयनॅाक्स पासपोर्ट'रूपी ठोस योजना घोषित केली आहे. या पासपोर्टमध्ये प्रेक्षकांना एका महिन्यात १० चित्रपट पाहायला मिळणार आहेत. हा मासिक सबस्क्रिप्शन पास प्रदर्शित होणारा प्रत्येक नवीन चित्रपट न चुकता पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी जणू पर्वणी ठरणार आहे. महागडी तिकिटे खरेदी न करता महिन्याभराच्या पासमध्ये नवनवीन चित्रपटांचा आनंद लुटता येणार आहे. आजपासून (१६ आॅक्टोबर) सबस्क्रायबर्सना या पासद्वारे सिनेमा पाहता येईल. सबस्क्रायबर्स फक्त ६९९ रूपयांमध्ये दर महिन्याला सोमवार ते गुरूवार या दिवसांमध्ये १० चित्रपट पाहू शकतात. यातून शुक्रवार आणि शनिवार-रविवार हा विकेंड असे तीन दिवस वगळण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की, प्रत्येक चित्रपट पाहण्याचा खर्च सुविधा शुल्क वगळून ६९.९० रूपये आहे. पीव्हीआर आयनॉक्सने फक्त २०,००० सबस्क्रिप्शन्ससह मर्यादित कालावधीच्या ऑफरअंतर्गत पासपोर्ट लाँच केले आहे. हा पासपोर्ट प्रेक्षकांना पीव्हीआर-आयनॅाक्सच्या अॅपवर तसेच त्यांच्या वेब साइटवरही मिळू शकेल.
या नावीन्यपूर्ण पासपोर्टबाबत पीव्हीआर आयनॉक्स लि.चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्त म्हणाले की, आम्हाला रसिकांकडून नेहमी महागड्या तिकिटांबाबत ऐकायला मिळायचे. हि तिकिटे प्रेक्षक आणि सिनेमा यांच्यात अडथळा ठरत असल्याचे लक्षात घेऊन आम्ही मासिक सबस्क्रिप्शन पास-पासपोर्ट सादर केला आहे, जो सिनेमॅटिक विश्वाचा आनंद उपभोगण्यामध्ये येणाऱ्या खर्चाबाबतच्या प्रेक्षकांच्या समस्यांचे निराकरण करेल.