नवनिर्वाचीत खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत भरघोस मतं मिळवून कंगना हिमाचल प्रदेशातीलमंडी भागात जिंकून खासदार झाली. अशातच चंदीगढ एअरपोर्टवर कंगनाला एका CISF जवान महिलेने कानशिलात लगावली. त्यामुळे हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच तापलंय. या घटनेनंतर कंगनाने ट्विटरवर लांबलचक लिहिलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
थप्पड प्रकरणानंतर कंगनाची प्रतिक्रिया
कंगना रणौतने ट्विटरवर या प्रकरणानंतर पोस्ट लिहिली आहे. कंगना लिहिते, "प्रत्येक बलात्कारी, खुनी किंवा चोर यांच्याकडे गुन्हा करण्यासाठी नेहमीच एक मजबूत असं भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक कारण असतं. कोणताही गुन्हा विनाकारण घडत नाही, तरीही त्यांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते.जर तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीशी निगडीत असाल तर देशाच्या सर्व कायद्यांचे उल्लंघन करून गुन्हा करण्याची तीव्र प्रेरणा येणारच."
कंगना पुढे लिहिते, "लक्षात ठेवा की, एखाद्या व्यक्तीच्या अत्यंत खाजगी क्षेत्रात तुम्ही प्रवेश करत असाल, त्या माणसाच्या परवानगीशिवाय त्याच्या शरीराला स्पर्श करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करत असाल तर तुम्ही बलात्कार किंवा खून करणं सुद्धा ठीक आहे, असं म्हणाल. यामुळे घुसखोरी करणं किंवा एखाद्याला चाकूने भोसकणं ही तुम्हाला मोठी गोष्ट वाटणार नाही. या गोष्टीचा तुम्ही खोलवर जाऊन विचार करा. गुन्हेगारी मानसिक प्रवृत्तींबद्दल मी इतकंच सुचवेन की, कृपया योग आणि ध्यान करा. अन्यथा तुमच्यासाठी जीवन एक कटू अनुभव देणारं ओझं होईल. कृपया दुसऱ्याबद्दल इतका द्वेष, मत्सर बाळगू नका. स्वतःला मुक्त करा."