महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा काल निकाल लागला. यामध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला. तर महाविकास आघाडी अक्षरश: तोंडावर आपटली. विरोधी पक्ष म्हणून दावा करण्याइतकेही त्यांचे आमदार निवडून येऊन शकले नाहीत. या ऐतिहासिक विजयानंतर सगळीकडून महायुतीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. दरम्यान अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतनेही (Kangana Ranaut) महाराष्ट्राच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीवर निशाना साधत कंगना म्हणाली, "आमच्या पक्षासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. स्वाभाविकच आम्ही सर्व कार्यकर्ता खूप आनंदी आहोत. महाराष्ट्राच्या जनतेचे, संपूर्ण भारताच्या जनतेचे आभार." मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, "पक्षाच्या जी विचारधारा आहे त्यासाठी एकापेक्षा एक नेतृत्व करणारे लोक आमच्याकडे आहेत. त्यामुळे याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील."
उद्धव ठाकरेंच्या पराभवाववर कंगना म्हणाली, "उद्धव ठाकरे हरतील हे अपेक्षितच होतं. इतिहास साक्ष आहे. दैत्य आणि देवतांची आपल्याला ओळख आहे. जे महिलांचा आदर करत नाहीत ते दैत्यांच्या श्रेणीतच येतात. आणि जे महिलांचा आदर करतात ते देवता आहेत हे स्पष्ट होतं. इथेही तेच झालं जे दैत्यांचं होतं त्यांचा पराभव झाला. महाभारतात तर एकच कुटुंब होतं सगळे भाऊ होते. पण फरक मोठा होता. महिलांचा अपमान करणं, माझं घर तोडलं, घाणेरड्या शिव्या दिल्या, कुठे ना कुठे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती हे दिसत होतं."
काँग्रेसवर कंगना म्हणाली, "त्यांना जनतेकडून चांगलंच उत्तर मिळालं आहे. हा देश बलिदानांचा आहे. काही मुर्ख आले की देशाचे तुकडे होऊ शकत नाहीत आणि होऊही देणार नाही."
२०२० मध्ये कोरोनाचा प्रसार असताना उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन महापालिकेने कंगनाच्या घराचा काही भाग तोडला होता. तो भाग बेकायदेशीर असल्याचं कारण देत ही कारवाई केली होती. कंगना आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय मतभेद होते. मात्र यामुळे उद्धव ठाकरेंनी कंगनाचा असा हिशोब केला होता. तेव्हा कंगनाने 'आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा' असं वक्तव्य केलं होतं.