अभिनेत्री मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तिचा जर्सी (Jersey Movie) चित्रपट लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘जर्सी’चा जागतिक टीव्ही प्रीमिअर ‘झी सिनेमा’वर पाहायला मिळणार आहे.
जर्सी चित्रपटात मृणाल ठाकूरने विद्याची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबद्दल तिने सांगितले की, मी विद्यासारखी व्यक्तिरेखा यापूर्वी कधी साकारलेली नाही. माझ्या आजवरच्या सर्व भूमिकांपेक्षा ती अगदी विरुध्द आहे. मला माझ्या व्यक्तिरेखांबाबत प्रयोग करायला आवडतात. यात मी आपल्या अटींवर जीवन जगणाऱ्या एका महिलेची भूमिका साकारीत आहे. ‘जर्सी’मध्ये लोकांना एका महिलेच्या स्वभावाला किती विविध छटा असू शकतात, ते पाहायला मिळेल. एक महिला ही आई असते, पत्नी असते, कुटुंबियांचा आधार असते, दुसर््याला विसाव्याचे स्थान असते आणि एक गृहिणी असते. मानवी जीवनातील नाट्य मला सर्वाधिक आकर्षित करतं आणि मला अशा भूमिका साकारण्याची संधी मिळते आहे, याचा आनंद वाटतो. विद्या ही मनाने कणखर असून ती आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यास समर्थ आहे. मी या चित्रपटाशी त्या दृष्टिकोनातून जोडली गेले आहे.