सिनेमात काम करणं हे आजच्या तरुण वर्गाचं मोठं आकर्षण आणि बॉलिवुडमध्ये म्हणजेच हिंदी सिनेमात काम करणे हे तरुण वर्गासोबत तमाम भाषेतल्या कलाकरांसाठीचे स्वप्न. परंतु हे स्वप्न सत्यात अवतरलंय मराठी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर सोबत. होय, ही मराठमोळी अभिनेत्री ए.जे.एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेअंतर्गत जतिन उपाध्याय, अलोक श्रीवास्तव निर्मित आणि अलोक श्रीवास्तव दिग्दर्शित “एंड-काऊंटर” या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या सिनेमात तिचा नायक, दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमातील गुणी अभिनेता प्रशांत नारायणन आहे. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी सुरू आहे.
मूळ पुण्याची असलेल्या मृण्मयीने यापूर्वी पुण्यात राहून अनेक सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. मॉडेलिंग जगतात तिने चांगला जम बसवला आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यास मृण्मयी खूप उत्सुक आहे. तिच्या या नव्या इनिंगविषयी ती सांगते, काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव हे पुण्यात एका मराठी सिनेमाच्या ऑडिशनसाठी आले होते, त्यांना एक मॉडर्न मुलगी हवी होती, त्यांनी माझी निवड केली आणि मला त्यावेळी मिस मॅच नावाचा पहिला मराठी सिनेमा मिळाला होता, ज्यात भूषण प्रधान माझा नायक होता. त्यांच्याच “एंड-काऊंटर” या हिंदी सिनेमात मी रेणू सहाय नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. रेणू ही एक कांदबरीकार आहे. मॉडर्न आहे, स्वतंत्र आहे, नैतिकता जपणारी आहे. आयुष्यात ज्या गोष्टी योग्य आहेच, त्याच तिला करायला आवडतात. प्रशांत नारायणन सिनेमात माझा नायक आहे.
हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल मृण्मयी सांगते की, चित्रीकरण करण्यापूर्वी अलोक सरांनी माझे वर्कशॉप घेतले होते. सिनेमातील अभिमन्यू सिंग, व्रिजेश हिरजी, अनुपम श्याम, उदय टिकेकर, एहसान कुरेशी, रणजीत, सत्यंवदा सिंग, सत्यशील नायक या कलाकरांनी काम करताना मला कोणतेही दडपण वाटू दिले नाही हेच त्यांचे मोठेपण आहे. या हिंदी सिनेमाकडून मला खूप अपेक्षा आहेत. या सिनेमामुळे मला हिंदीचे दरवाजे उघडतील अशी मला आशा आहे.