भारतीय संगीत महोत्सवांमधील एम टीव्ही इंडिया म्युझिक समीट राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संगीतप्रेमींना दर्जेदार संगीत पर्वणी देण्यासाठी सज्ज झाला असून येत्या १२ ऑक्टोबरला जयपूर येथे होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावेळी या महोत्सवाचे मुख्य सल्लागार प्रसून जोशी, गायक कैलास खेर, रेमण्डचे गौतम सिंघानिया, म्युझिकन्सेप्ट्सच्या सहसंस्थापक माला सेख्री, अपर्णा जोशी, अंबिका श्रीवास्तव यांच्यासोबतच संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हा संगीत महोत्सव १२ ते १४ ऑक्टोबर पर्यंत जयपूर येथे होणार आहे.
संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांची मांदियाळी या संगीत महोत्सवाला लाभणार असून या महोत्सवात सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक एल सुब्रमणीयम यांचे व्हायोलीन वादन, बेगम परवीन सुलताना यांचे हिंदुस्थानी क्लासिकल, प्रसिद्ध सितारवादक शुजीत खां यांचे सितार वादन असा अनेक दिग्गजांचे ‘न भूतो’ असे कला सादरीकरण रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. यासोबतच कैलास खेर यांचा कैलासा बँड, शंकर महादेवन, सुरेश वाडकर अशा अनेकांची नावे या महोत्सवासोबत जोडली गेली असून हा महोत्सव म्हणजे कानसेनांना अनोखी मेजवानी ठरणार आहे.
भारतीय अभिजात संगीताला फ्युजनसोबत जोडणारा हा एम टीव्ही इंडिया म्युझिक समीट कानसेनांचे कान घडवणार महोत्सव असेल अशी अशा या महोत्सवाचे मुख्य सल्लागार प्रसून जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. या संगीत महोत्सवातील दर्जेदार सादरीकरणाला तेवढेच दर्जेदार श्रोते लाभणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रसून जोशी यांनी लिहून संगीतबद्ध केलेले आणि शंकर महादेवन यांचा आवाज लाभलेले इंडियन म्युझिक समीटचे थीम सॉंग ‘एक सच्चा सूर’ हे गाणे सादर करण्यात आले आणि त्याला रसिकांनी दिलखुलास दाद दिली.