Join us  

"सिनेमाने ४ कोटी कमावले तरी तुम्ही भाग्यवान", १०० कोटी कमावणाऱ्या 'मुंज्या'च्या दिग्दर्शकाला रिलीजआधी घातलेली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 1:18 PM

"मोठमोठे सिनेमे चालत नव्हते, त्यामुळे...", 'मुंज्या' सिनेमाच्या मराठमोळ्या दिग्दर्शकाला होती भीती

मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या 'मुंज्या' या बॉलिवूड सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ७ जूनला प्रदर्शित झालेल्या 'मुंज्या' सिनेमाने तब्बल १०० कोटींचा बिजनेस केला. कोकणातील भूताची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण, सिनेमा रिलीज करण्याआधी 'मुंज्या' इतकी कमाई करेल अशी अपेक्षा दिग्दर्शकाला नव्हती. शिवाय या सिनेमाने ४ कोटी कमावले तरी तुम्ही भाग्यवान, असा अंदाज बांधत दिग्दर्शकाला सल्ला देण्यात आला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदित्य सरपोतदार यांनी याचा किस्सा सांगितला आहे. 

आदित्य सरपोतदार यांनी अमोल परचुरे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "जेव्हा सिनेमा रिलीजसाठी येणार होता. तेव्हा दिसत होतं की सिनेमे चालत नाहीयेत. मोठमोठे सिनेमे चालत नव्हते. मोठ्या स्टारचे सिनेमे चालत नव्हते. थिएटरमध्ये सिनेमा रिलीज करताना तो चान्स आपण घेतो. पण, पहिलाच सिनेमा जर नाही चालला तर ती धडपड पुन्हा शून्यातून सुरू करावी लागते. कुठेतरी इंडस्ट्रीच तुम्हाला याबद्दल सांगत असते. सिनेमात मोठे स्टार्स नाहीयेत. खूप रिजनल सिनेमा आहे. तू मराठी दिग्दर्शक आहेस...त्यात नाव मुंज्या आहे. त्यामुळे लोकांना हा मराठीच सिनेमा वाटेल. लोकांना कळणारच नाही की हिंदी सिनेमा आहे. मराठी कलाकारही सिनेमात आहेत, त्यामुळेही असं वाटू शकतं. या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येत होत्या". 

"आपल्याकडे एक एजन्सी असते जी आपल्याला ट्रॅकिंग नंबर्स देत असते. आम्हाला जे ट्रॅकिंग नंबर्स दिले होते. मुंज्याला जो विकेंडचा एक्झिट पोल मिळाला होता...तो १० टक्के पण नव्हता. आम्हाला शुक्रवारी ७५ लाख रुपये बिझनेस होईल आणि शुक्रवार, शनिवार, रविवार मिळून ४ कोटी बिझनेस झाला तरी तुम्ही भाग्यवान आहात, असं आम्हाला सांगितलं होतं. हे सगळेच एक्झिट पोल चुकले. आमच्याबाबतीत हे एक्झिट पोल चुकले याचा मला आनंद आहे. पण, या गोष्टी खऱ्या आहेत. त्यामुळे पूर्णपणे तुम्ही त्या नाकारू शकत नाही. हा सिनेमा चालेल की नाही ही शंका माझ्याही मनात होती. महाराष्ट्रात हा सिनेमा चालेल याची खात्री होती. पण, मराठी सिनेमाचं मार्केट साइज आपल्याला माहीत आहे. हिंदी सिनेमा जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो दिल्लीत आणि इतर ठिकाणी किती चालावा याची गरज माहितीये. आता आकडे बघून समजतं की महाराष्ट्राबाहेर हा सिनेमा किती चाललाय", असंही त्यांनी पुढे सांगितलं. 

'मुंज्या' सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.'स्त्री' या सिनेमाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून मुंज्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी