अभिनेता साहिल खानच्या अडचणी वाढल्या आहे. महादेव बेटिंग App प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने त्याला ताब्यात घेतलं आहे. खान द लायन बुक App नावाच्या बेटिंग App शी साहिल जोडला गेला होता, जो महादेव बेटिंग App नेटवर्कचा देखील भाग आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती. अभिनेत्याने जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
महादेव बेटिंग App प्रकरणात आता अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. अभिनेत्याला छत्तीसगडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे, तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग App वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग App नेटवर्कचा भाग आहे.
अभिनेत्यावर लायन बुक App चा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्याने Lotus Book 24/7 App लाँच केलं. तो सेलिब्रिटींना बोलावून मोठ्या पार्ट्यांचं आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील आणखी महत्त्वाच्या बाबी समोर येऊ शकतात.
कोण आहे साहिल खान?
अभिनेता साहिल खान त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. एक्सक्यूज मी आणि स्टाईल सारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे. मात्र साहिलला चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नाही. त्याने इंडस्ट्री सोडली. त्यानंतर त्याचा फिटनेस प्रवास सुरू झाला आणि तो फिटनेस इन्फ्लुएंसर बनला. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो, जी फिटनेस सप्लिमेंट्स विकते. साहिल म्हणतो की, तो टॅलेंटेड आहे, पण त्याच्या टॅलेंटचा चित्रपटांमध्ये योग्य वापर झाला नाही. त्यामुळेच त्याने बिझनेसमन होण्याचा विचार केला.