मुंबईवरुन गोव्याच्या दिशेने रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी (२ ऑक्टोबर) एनसीबीने (NCB) छापा टाकला. या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचं समोर आलं. याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह अन्य ८ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या सामान्यांपासून कलाविश्वापर्यंत या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे आर्यनसह दिल्लीतील काही नामांकित उद्योजकांच्या मुलीदेखील या पार्टीमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं आहे. त्यातच या पार्टीसाठी प्रत्येक सदस्याने किती पैसे मोजले होते हे समोर आलं आहे. 'एबीपी न्यूज'च्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आलं आहे.
एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये काही जणांची चौकशी सुरु आहे. तर, आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यनसह मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही अटक झाली आहे. या तिघांच्याही वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना मुंबईतील जे. जे रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या वैद्यकीय चाचणीनंतर तिघांनाही किला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
आर्यन खानला ताब्यात घेणाऱ्या समीर वानखेडेंचं क्रांती रेडकरसोबत आहे खास कनेक्शन
पार्टीसाठी प्रत्येकाने मोजले ५ लाख रुपये?
क्रुझवरील ड्रग्स पार्टीच्या प्रवेशसाठी प्रत्येकाकडून ८० हजार ते ५० लाख रुपयांचं शुल्क आकारण्यात आलं होतं. दोन हजार प्रवासी संख्या असलेल्या या क्रुझवर एक हजारांपेक्षा कमी लोक उपस्थित होते. तसंच या पार्टीचं निमंत्रण इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देण्यात आलं होतं.
समीर वानखेडेंच्या नेतृत्त्वाली झाली छापेमारी
एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. वानखेडे आणि त्यांच्या टीमने या क्रुझवर सापळा रचून ही पार्टी उधळून लावली. यात १० जणांना ताब्यात घेण्यात आलं असून आरोपींकडून चरस, एमडीएमए, एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.