शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सनकी हिरो अनेकांना भावला नाही. मुंबईतील एक डॉक्टर यापैकीच एक . ‘कबीर सिंग’ पाहिल्यानंतर मुंबईच्या या डॉक्टरने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या सिनमात शाहिद कपूरने एका सनकी आणि अग्रेसिव्ह डॉक्टरची भूमिका साकारली आहे. यामुळे डॉक्टर्सच्या प्रतिमेला धक्का पोहचत असल्याचा तक्रारकर्त्या डॉक्टरचा दावा आहे. चित्रपटातील हिरो दारूच्या नशेत ऑपरेशन करतो. हे दृश्य वैद्यकीय पेशाची प्रतिमा मलिन करणारे आहे,असेही या डॉक्टरने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोग्य मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आरोग्य राज्य मंत्री आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून त्याने या सिनेमाचे स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी केली आहे.यापूर्वी बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा आणि प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवलेला आहे. ‘मी कबीर सिंग हा सिनेमा पाहण्यास नकार देतेय. मी शाहिदची खूप मोठी चाहती आहे. पण स्टॉकिंग कुठल्याहीप्रकारे न्याय्य ठरवल्या जाऊ शकत नाही, ते स्वीकार्य नाही,’ असे ट्वीट शोभा डे यांनी केले होते.