घाटकोपरवरून वर्सोवाला जाताना आपण अनेकवेळा गाडीने अथवा बसने जाण्याऐवजी मेट्रोने जाणे पसंत करतो. मेट्रोने वेळ वाचत असल्याने सध्या मुंबईतील अनेक लोक मेट्रोलाच प्राधान्य देतात. आजवर अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटींनी मेट्रोने प्रवास केला आहे. पण आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने देखील ट्रॅफिकमध्ये न अडकता मेट्रोने प्रवास केला. त्यानेच या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून त्याबाबत त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.
अक्षयने मेट्रोने घाटकोपर ते वर्सोवा प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्याचा मेट्रोने प्रवास करण्याचा अनुभव कसा आहे याविषयी त्याने सांगितले आहे. तो या व्हिडिओत बोलताना दिसत आहे की, प्रचंड ट्रॅफिक असल्याने आम्हाला वर्सोवाला पोहोचायला गाडीने दोन तास तरी लागले असते. त्यामुळे गुड न्यूज या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी मेट्रोने प्रवास करायचे सुचवले. त्यामुळे आम्ही मेट्रो पकडली. मी सध्या मेट्रोतच असून मी एका कोपऱ्यात उभा आहे. पण येथील काही लोकांनी मला ओळखले आहे. मी केवळ दोन सिक्युरीटी गार्ड घेऊन मेट्रोने प्रवास करत आहे. मला पोहोचायला आता फक्त 20 मिनिटे लागणार आहेत. मेट्रो ही एकच सुविधा आहे, जी पावसात देखील सुरू असते. पावसात पाणी जमले तरी त्याचा परिणाम मेट्रोच्या सेवेवर होत नाही.
अक्षय हे सगळे बोलल्यानंतर कॅमेरा लोकांकडे फिरवताना दिसत आहे. त्यावेळी आपल्याला मेट्रोत चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. अक्षयने मेट्रोने प्रवास केल्यानंतर मेट्रोच्या टीमने ट्विटरद्वारे अक्षयचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुम्ही प्रवासासाठी मेट्रोला प्राधान्य दिले यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. मेट्रोमुळे खरंच ट्रॅफिकपासून सुटका होते. एखाद्या बॉससारखे तुम्ही देखील प्रवास करता...
अक्षयच्या गुड न्यूज या चित्रपटाचे सध्या मुंबईतील विविध भागात चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच करिना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे.