मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ड्रग्ज पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेतलं आहे. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाचा आर्यन खानचादेखील समावेश आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईत अनेक बड्या उद्योगपतींच्या मुलींचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने १० जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामध्येच वानखेडे यांनी आर्यनला ताब्यात घेतल्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
'माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत; शाहरुखच्या वक्तव्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
"आर्यन खान, मुनमून धमेचा,इस्मीत सिंग,विक्रम छोकेर,अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल या सगळ्यांची सध्या क्रुझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणी चौकशी सुरु आहे", असं म्हणत समीर वानखेडे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.अरबाज मर्चंट हा आर्यन खानचा जवळचा मित्र आहे.
तसंच ''या पार्टीमध्ये कलाविश्वातील अन्य सेलिब्रिटी होते का?'' असा प्रश्न विचारल्यानंतर "सध्या मी याविषयी काहीच माहिती देऊ शकत नाही", असंही वानखेडे यांनी सांगितलं.
एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाले आर्यनचे व्हिडीओ
एनसीबी अधिकाऱ्यांना आर्यन खानचे क्रुझवरील व्हिडीओ मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये आर्यन स्पष्टपणे दिसत असून त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये दिसत आहे.
आर्यनचा मोबाइल जप्त, चॅट्सची होतीये तपासणी
एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाईल फोन जप्त केला आहे. सध्या त्याच्या चॅट्स आणि अन्य टेक्स्ट मेसेजची तपासणी केली जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त ताब्यात घेण्यात आलेल्या इतरांचेही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.