मुंबईतील घरांचे भाडे परवडत नसल्याने मी चित्रीकरणासाठी पुणे-मुंबई प्रवास करायचे - राधिका आपटे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 6:17 AM
राधिका आपटने आज बॉलिवूडमध्ये तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. पण तिच्यासाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. राधिका सांगतेय तिच्या ...
राधिका आपटने आज बॉलिवूडमध्ये तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. पण तिच्यासाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. राधिका सांगतेय तिच्या स्ट्रगलच्या दिवसांविषयी...तू अभिनेत्री व्हायचं हे कधी ठरवलंस? कॉलेजमध्ये की शाळेत असतानाच?शाळेत असताना. मी आमिर खान आणि बॉलिवूडची चाहती होते. मला सिनेमे फारच आवडायचे. मी शाळेत असताना नाटकात काम करायला सुरुवात केली आणि कॉलेजमध्ये गेल्यावर आॅडिशन्स द्यायला सुरुवात केली आणि पहिला सिनेमा सुनिल सुखटणकर आणि सुमित्रा भावे यांच्याबरोबर केला. मी काम करत असताना लक्षात राहिला तो कॅमेरा आणि मी त्यातले प्रमुख पात्र होते. प्रत्येक फ्रेममध्ये मीच होते. मग मी कॅमेराबरोबर मैत्री वाढवली आणि आश्चर्य म्हणजे मला खूप आवडलं ते, पटलंही की मला हेच हवं होतं.तू मुंबईत कधी आलीस, तुला काही त्रास झाला का? हे सगळं खूप कठीण आहे असं तुला कधी जाणवलं का? काही अडचणी आल्या का?खरं तर हो. मी पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मी नाटक करायला आले होते. मी बॉम्बे ब्लॅक हे नाटक अनिथा ओबेरॉयबरोबर केले होते. त्या नाटकाची निर्मिती शामक दावर यांनी केली होती. त्यावेळी मी ५- ६ महिने लोखंडवालामध्ये राहिले होते, तेव्हा मी ठरवलंही होतं की खूप कष्ट करायचे आणि सिनेमात काम मिळतंय का ते पाहायचं. मी ३ ते ४ लोकांना ओळखत होते, एक म्हणजे अतुल कुलकर्णी जे पुण्याचे आहेत. मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारला की मुकेश छाब्रासारख्या काही कास्टिंग डायरेक्टरना ओळखतात का? मला त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं हे माहीत नव्हते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझे कुणीच मित्र-मैत्रिणी नव्हते आणि मला सुरुवात कुठून करायची हेही माहीत नव्हते.मुंबईत राहाण्यासाठी पैशांची जमवाजमव कशी केली?मी फारच पूर्वीपासून आई-बाबांकडून पैसे घ्यायचे बंद केले होते. मी पुण्यात जेव्हा नाटक करायचे, तेव्हा मला पैसे मिळत नव्हते. पण मला वर्कशॉपमधून पैसे मिळायचे. बॉम्बे ब्लॅक दरम्यान आम्हाला प्रत्येक शोसाठी १५०० ते ३००० रुपये मिळत होते. लोखंडवालामध्ये आम्ही एका अपार्टमेंटमध्ये तीन जण राहात होतो आणि त्याचं महिन्याचं भाडे 7000 रुपये होते. मी काही महिने राहिली आणि त्यानंतर मी मुंबई सोडलं. त्याआधी मी ‘शोर इन द सिटी’ आणि ‘रक्त चरित्र’ साठी आॅडिशन्स दिल्या होत्या, ते सिनेमे मिळाले आणि केलेही. हे सिनेमे करत असतानाही मी पुण्यात राहूनच काम करत होते. सिनेमाच्या शूटिंगच्या दिवशी मी मुंबईत यायचे, मैत्रिणीबरोबर राहायचे आणि मग परत जायचे किंवा मी त्यांना हॉटेलमध्ये राहायची सोय करायला सांगायचे. देव डी किंवा इतर आॅडिशन्स सुरू असतानाही पुण्याहून यायचे. पुण्याहून सकाळी शिवनेरीने यायचे आणि आॅडिशन्स देऊन रात्री पुन्हा दादरहून शिवनेरी पकडून परत जायचे. तू कधी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहेस का?फार नाही. आम्ही रंगमंचावर संपूर्ण रात्र नाटक करायचो. कार्यशाळेत सहभागी व्हायचो. केरळला गेल्यावर मी इतर लोकांची नाटकं पाहिली आणि त्यांच्याकडून शिकले. मी इतकंच केलं आहे, पण मला खूप धमालसुद्धा आली. अॅक्टिंग अड्डा हा नवा प्लॅटफॉर्म सध्या निर्माण झाला आहे. त्याचा फायदा आजच्या तरूणाईला होईल असे तुला वाटते का?बॉलिवुडची स्वप्ने पाहणाऱ्यांना अॅक्टिंग अड्डा अभिनयाचे धडे गिरवायला शिकवतोच. शिवाय त्यांना ऑडिशन्स पाठवण्यासाठी एक व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात आले आहे, यामुळे आपल्या घरातूनच आत्मविश्वासासह एक चांगली संधी मिळवता येऊ शकते. मी संघर्ष करत होते, त्यावेळी असा काही पर्याय असता तर फार बरे झाले असते! मला पुणे ते मुंबई येणं-जाणं इतका त्रास काढावा लागला नसता. मुलांना फायदा होईल, अशा कार्यशाळांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री होण्यासाठी एखाद्याने काय लक्षात ठेवायला हवं?खूप कष्ट आणि आपल्या क्षमतांची पुरेपूर जाणीव, हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. काही लोकं येतात आणि सांगतात की, ते चांगला अभिनय करू शकतात परंतु त्यांना संधी मिळत नाही. माझ्या मते, तुमच्याकडे महत्त्वाकांक्षा हवी. शिवाय नेमके काय हवेय तेही माहीत असायला हवे.आता किंवा पूर्वी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणं किती कठीण आहे?आजच्या तुलनेत पूर्वी ते फार कठीण होतं, आता ते थोडं खुलं झालं आहे. या उद्योगक्षेत्रातील कुठलीही पार्श्वभूमी नसताना अनेक माणसं आज बॉलिवुडमध्ये येत आहेत.