बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे झीनत अमान (zeenat aman). उत्तम अभिनय आणि बोल्डनेसच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीचा एक काळ गाजवला. इतकंच नाही तर आजही त्या सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतात. अलिकडेच त्यांनी लिव्ह इन रिलेशनशीपविषयी भाष्य केलं.त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर कमालीची चर्चा झाली. त्यांच्या या वक्तव्यावर आता लोकप्रिय अभिनेत्री मुमताज (Mumtaz) यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मुमताज यांना जीनत अमान यांचं वक्तव्य पटलं नसून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर लिव्ह इन रिलेशनशीपविषयी भाष्य केलं. यात त्यांनी तरुणांना लग्न करण्यापूर्वी एक सल्ला दिला. त्यानुसार, एकमेकांना समजून घेण्यासाठी, बाँण्ड चांगलं होण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणं गरजेचं आहे असं म्हटलं होतं. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली. त्यावर, आता मुमताज यांनी जीनत अमान यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
अलिकडेच मुमताज यांनी 'झूम'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलं. "झीनतच्या मताशी मी सहमत नाहीये. कितीही लिव्ह इन रिलेशनमध्ये रहा पण त्याची काय गॅरंटी आहे? कितीही महिने लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतरही तुमचं लग्न यशस्वी ठरेलच याची गॅरंटी काय आहे? मी तर म्हणते, लग्नच करायला नको. एका ठराविक वयात स्वत:ला बांधून ठेवायची काय गरज आहे? जी व्यक्ती फक्त तुमच्यावर प्रेम करेल, तुमच्यासाठीच ती आहे अशा व्यक्तीचा शोध घ्या. काळ फार पुढे निघून गेलाय. कोणत्याही मुलीला स्वत: ला पूर्ण करण्यासाठी पुरुषाची गरज नाही हा विश्वास आपल्या मुलींमध्ये निर्माण करा आणि त्यानुसारच तिची जडणघडण कराल. कारण, लग्न केलं की ते आयुष्यभर पार पाडत बसावं लागतं", असं मुमताज म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "लिव्ह इन रिलेशनशीपची बाजू मांडत बसणं अजिबातच योग्य नाही. एक समाज आणि एक राष्ट्र या नात्याने अजूनही आपण या संकल्पनेसाठी मानसिकरित्या तयार झालेलो नाहीये. त्यामुळे जीनतला वेळीच सांगायला हवं ही की ती तरुणांना काय सल्ला देतीये. एका वक्तव्यामुळे ती अचानक सोशल मीडियावर चर्चेत आली. आणि, ती स्वत:ला कूल आंटी दाखवायची तिची एक्साइटमेंट मी समजू शकते. पण, आपल्या नैतिक मुल्यांना बाजूला सारून असे सल्ले देऊन फॉलोअर्स वाढवणं हा मार्ग योग्य नाही."
दरम्यान, "जर प्रत्येक मुलीने लिव्ह इन पद्धतीने रहायचं ठरवलं तर आपल्या इथे लग्नसंस्था नष्ट होईल. तुम्हीच मला सांगा, जो मुलगा आधी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिला आहे अशा मुलासोबत तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न कराल का? झीनतचंच उदाहरण घ्या ती मजहर खानला लग्नापूर्वी कित्येक वर्षांपासून ओळखत होती. मात्र, शेवटी तिचं आयुष्य नरकासारखंच झालं होतं ना."