'राजा हिंदूस्तानी', 'हम साथ साथ हैं', 'दिल तो पागल हैं' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा देणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर (Karisma kapoor). या अभिनेत्रीने ९० चा काळ अक्षरश: गाजवला. त्यामुळे आजही तिचे सिनेमा प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहातात. करिश्माचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडिया, बॉलिवूड पार्ट्यांमुळे ती कायम चर्चेत असते. यात अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने करिअरमधील खाचखळग्यांविषयी भाष्य केलं आहे.
करिश्मा लवकरच 'मर्डर मुबारक' या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या ती सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरमध्ये आलेल्या चढउतारांविषयी भाष्य केलं. सोबतच तिने काम केलेला काळ आणि आताचा काळ यांच्यात काय बदल झाले हे देखील तिने सांगितलं.
"आताच्या घडीला बॉलिवूडमधील कोणते बदल झाल्याचं तुला जाणवतात?’ असा प्रश्न करिश्माला विचारण्यात आला. यावर, "खरं सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्ट बदलली आहे. तेव्हा आम्ही फक्त मनाने विचार करायचो. कोणत्याही गोष्टींचा हिशोब ठेवत नव्हतो. तेव्हा आमच्याकडे पीआर टीम नव्हती. कोणी स्टालिश नव्हते. सगळं काही आमचं आम्हीच करायचो. सेटवर जायचो आणि शुटिंग सुरु करायचो", असं करिश्मा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "तेव्हा काय करायला हवं, काय नको हे सांगायला आम्हाला कोणी नव्हतं. पण, मनात काम करायची जिद्द होती त्यामुळे काम करायचो. एखाद्या सिनेमामुळे किंवा गाण्यामुळे माझ्या करिअरमध्ये मोठे बदल होतील हा विचार करुन मी कधीच काम केलं नाही. त्यामुळे आता मी मागे वळून पाहते तेव्हा 'हिरो नंबर 1' नंतर मी यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले होते. त्यानंतर मग ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली."
दरम्यान, 'मर्डर मुबारक' या सिनेमाच्या माध्यमातून करिश्मा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिच्यासोबत सारा अली खान, पंकज त्रिपाठी ही कलाकार मंडळी झळकणार आहेत. हा सिनेमा येत्या १५ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.