Join us

नोकरीच्या नावाखाली फसवणूक, टॉयलेटमध्ये घालवली रात्र; 'किसी का भाई...'च्या म्युझिक कंपोजरची भावूक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 2:18 PM

रवी बसरुर यांची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल.

बॉलिवूड स्टार्सची लक्झरी लाईफ अनेक आकर्षित करते. पण खरं तर इतकं यश मिळवण्यासाठी त्यांना आधी किती कष्ट करावे लागले आहेत. दरम्यान त्यांना हलाखीचं जीवनही जगावं लागलं आहे. अशीच काहीशी गोष्ट आहे 'किसी का भाई किसी की जान' चा संगीतदिग्दर्शक रवि बसरुरची (Ravi Basrur).

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ आहे. फिल्ममधील गाणीही विशेष गाजत आहेत. सलमानच्या या फिल्मसाठी संगीतदिग्दर्शन करणारे रवि बसरुर यांना सगळं श्रेय जातं. आज अनेकांच्या तोंडावर रवि बसरुर यांचं नाव आहे. पण त्यांना मिळालेलं हे यश सहजरित्या मिळालेलं नाही. त्यांचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. 

रवि बसरुर यांना लोक किरण नावानेही ओळखतात. त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला.संगीतक्षेत्रात येण्यापूर्वी ते शिल्पकार होते. गरिबीमुळे त्यांनी मजूर, सुतार आणि टेलरची कामही केली आहेत. आपला संघर्ष सांगताना रवि यांनी सांगितले की ते दिवसा मूर्ती बनवायचे तर रात्री पब आणि रेस्टॉरंटमध्ये गाणी गायचे. एक दिवस एका व्यक्तीने त्यांना मोठ्या पब मध्ये संधी देण्याचं वचन दिलं. रवि सगळं सोडून तिथे पोहोचले पण बघतात तर काय त्या पबवर पोलिसांची धाड पडली. तेव्हा त्यांना सगळी स्वप्नं संपल्यासारखे वाटले.

रवि बसरुर म्हणाले, 'मी हताश झालो होतो. नोकरी नव्हती डोक्यावर छतही नव्हतं. परत आधीच्या नोकरीवर परतू शकत नव्हतो.मी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. पोलिसांनी मला पकडलं आणि माझी गिटार,तबला तोडून टाकला. त्यामध्ये बॉम्ब असल्याचा संशय त्यांना आला होता.त्या दिवशी तिथे बॉम्ब विस्फोट झाला होता. मी अतिशय वाईट काळातून जात होतो. मी मुंबई सोडून मँगलोरला गेलो. पूर्ण रात्र मी ट्रेनमध्ये रडलो. सार्वजनिक शौचालयातही राहिलो. मंदिरात जेवण करायचो.'

मात्र काळोखानंतर प्रकाश येतोच. तसंच काहीसं रवि यांच्या आयुष्यात झालं. एका मित्राच्या ओळखीतून त्यांना रेडिओ स्टेशनमध्ये 15 हजाराची नोकरी मिळाली. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि एक दिवस त्यांना 'उग्रम' या सिनेमात ब्रेक मिळाला.यानंतर त्यांनी यशच्या KGF ला संगीत दिले आणि त्यांचं आयुष्यच बदललं.

टॅग्स :संगीतबॉलिवूडसलमान खान