Join us

'हम दो हमारे बाराह' वादाच्या भोवऱ्यात; मुस्लीम समुदायाने घेतला पोस्टरवर आक्षेप?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 12:32 PM

Hum do hamare barah: 'हम दो हमारे बाराह' या चित्रपटात अभिनेता अन्नू कपूर मुख्य भूमिका साकारत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. आमिर खानचा (aamir khan) 'लालसिंह चड्ढा' या चित्रपट चर्चेत असतानाच आता 'हम दो हमारे बाराह' (hum do hamare barah) हा अपकमिंग चित्रपट वादात सापडला आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं. हे पोस्टर प्रदर्शित होताच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला. या पोस्टरवर मुस्लिम समुदायाने आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे.

'हम दो हमारे बाराह' या चित्रपटात अभिनेता अन्नू कपूर मुख्य भूमिका साकारत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या पोस्टरमध्ये एक फॅमिली फोटो दिसत असून अन्नू कपूर कुटुंबप्रमुख म्हणून फोटोच्या मध्यभागी बसले आहेत. तर, त्यांच्या आजुबाजूला महिला, लहान मुलं आणि वकील दिसून येत आहेत. थोडक्यात लोकसंख्या वाढीवर आधारित हा चित्रपट असल्यामुळे अनेकांनी यावर अनेकांनी टीकास्त्र डागलं आहे. विशेष म्हणजे मुस्लीम समुदायाने या पोस्टरवर आक्षेप घेतल्याचं सांगण्यात येतं. या विरोधानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी टीकाकारांना संयमाने वागण्यास सांगितलं आहे.

'हम दो हमारे बाराह' या चित्रपटाचं दिग्दर्शन कमल चंद्रा यांनी केलं असून त्यांनी टीकाकारांना संयम राखण्यास सांगितला आहे. तसंच 'हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट समुदायावर आधारित नाही', असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याविषयी पत्रकार अयुब राणा यांनी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत एक ट्विट केलं. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“ज्या सिनेमात मुस्लिम समाज हा लोकसंख्या वाढीस कारण असल्याचं दाखवलं जातं त्या सिनेमाला सेन्सॉर बोर्ड कशी परवानगी देतं. सिनेमात मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात आलंय. एका मुस्लिम कुटुंबाचा फोटो वापरून त्यावर हम दो हमारे बारह असं शीर्षक देणं म्हणजे इस्लामोफोबिया आहे,” असं ट्विट अयुब राणा यांनी केलं आहे.

नेमकं काय आहे पोस्टरमध्ये?

'हम दो हमारे बाराह' या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक कुटुंब दाखवण्यात आलं आहे. यात कुटुंबप्रमुख म्हणून अन्नू कपूर असून त्यांच्या आजूबाजुला स्त्रिया आणि मुले आहेत. तसंच  “लवकरच चीनला मागे टाकू” असं कॅप्शनही या फोटोवर देण्यात आलं आहे. त्यामुळे हे पोस्टर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. 

टॅग्स :बॉलिवूडअन्नू कपूरसेलिब्रिटीसिनेमाआमिर खान