महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये काळानुरूप बदल होत आहेत. मात्र, महिलांनी कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये. ‘मीटू’ चळवळीमुळे महिलांना अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आत्मविश्वास मिळाला. ‘मीटू’ चळवळ महिलांचा आवाज बनली. माझ्या न्यायाच्या लढाईने सर्व महिलांना प्रेरणा मिळाली, याचा मला नक्कीच आनंद आहे. यापुढेही महिलांनी अन्याय सहन करू नये, असा संदेश अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सीएनएक्स मस्तीच्या जान्हवी सामंत यांच्याशी बोलताना दिला.
* गेल्या काही आठवड्यांपासून सुरू झालेल्या ‘मीटू’ चळवळीचा चेहरा तू बनली आहेस. या चळवळीमुळे तुझं आयुष्य किती बदललंय?- मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी आहे. ‘मीटू’ या चळवळीमुळे सर्वजण जागरूक होत आहेत. ज्यांच्यावर अन्याय होत आहे, ते पुढे येऊन आत्मविश्वासाने स्वत:ची भूमिका मांडत आहेत. सोशल मीडियामुळे व्यासपीठ मिळवून दिले आहे. मी कधीही चळवळीचा विचार केला नव्हता. मी केवळ माझी लढाई लढत होते. मला आनंद वाटतोय की, मी काही बदल घडवून आणू शकले. मलाही अनेक अडचणी, संकटांमधून माझे मार्गक्रमण करावे लागले. माझे आयुष्य बदलले आहे. पण, मी समाजासाठी काही करू शकले याचा मला नक्कीच आनंद वाटतोय.
* तुझ्यावर होणाऱ्या टीकेचा सामना तू कसा केलास?- गेल्या आठ वर्षांपूर्वी झालेल्या घटनेनंतर मी अध्यात्मिक मार्गाला लागले होते. मी चर्चमध्ये जायचे. मला जिथे मानसिक स्थैर्य मिळायचं त्या शांतीच्या मागे मी धावत होते. मी भगवदगीता, शिवसाधना वाचायचे. मी रोज योगा, ध्यानधारणा, विपश्यना करायचे. यादरम्यान मी देवाची आराधना केली, त्यामुळे मी स्वत:ला यातून बाहेर काढू शकले. अनेक व्यक्तींमध्ये नकारात्मकता असतेच. त्यातून आपण काहीतरी सकारात्मक शोधून काढावे लागते. प्रामाणिक आणि खऱ्या लोकांना नेहमीच स्ट्रगल करावा लागला आहे. अनेक प्रसंगांमध्ये स्वत:चे मानसिक संतुलन कसे ठेवायचे याकडे आपण खरंच लक्ष दिलं पाहिजे.
* लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे बघण्याची लोकांची मानसिकता कशी बदलू शकते?- खरंतर महिलांनी कधीही काहीही सांगितले तर त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही. समजा तिने तिच्यावर झालेला गैरप्रकार घरातल्या किंवा जवळच्या व्यक्तीला जाऊन सांगितला तर त्या व्यक्तीने महिलेकडे दुर्लक्ष न करता ते ऐकून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी माझ्याबाबतीत अशा घटना घडल्या तेव्हा मी करिअरच्या उंचीवर होते. त्यामुळे मला माझे करिअर देखील सावरायचे होते. आपण माणूस आहोत, रोबोट नाही, हे समोरच्या व्यक्तीला कळायला हवे. घटना कितीही वाईट असली तरीही तुम्हाला खंबीर होणं गरजेचंच असतं. त्यामुळे मनात कुणाबद्दलही राग, द्वेष, घृणा ठेवू नये.
* न्याय मिळवण्यासाठी कायद्याचा आधार घेतला जातो. पण, आजच्या जगात भावनांनाही तेवढेच महत्त्व असते. या गोष्टीकडे तू कशी बघतेस?- ‘मीटू’ चळवळीची आई म्हणून बनवारी देवी यांच्याकडे बघितले जात आहे. त्यांना न्याय मिळाला? त्यांच्यावर तर गँगरेप झाला होता. खूप कमी केसेस आहेत की ज्यांना न्याय मिळाला आहे. कायदा आहे मात्र त्यांना राबवणारे पण माणसंच आहेत. दुसऱ्यांवर टीका करणं सोप्पं असतं. तुम्ही स्वत:ला त्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेऊन बघा, म्हणजे समजेल.
* काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. तुझ्या समर्थकांना तू दिवाळीनिमित्त कोणता संदेश देशील?- आपल्या देशात वेगवेगळे सण मोठया भक्तीभावाने साजरे केले जातात. हे सण असत्यावर सत्याचा विजय होत असतो, यासाठी ओळखले जाते. त्यामुळे लोकांचं कामच आहे बोलणं तर त्यांना बोलू द्या, आपण योग्य काम करणार तर आपल्याला विरोध तर होणारच आहे. दिवाळी सेलिब्रेट करा, न्यायासाठी लढत राहा.