मुंबई- 'द काश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) सिनेमामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलीवूडच्या टॉपमोस्ट दिग्दर्शकांमध्ये विवेक अग्निहोत्री हे नाव आता सामिल झालं आहे. बड्या स्टार्सना आता विवेक अग्निहोत्रींसोबत काम करायचं आहे, अशी चर्चा आहे. मात्र याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद रंगण्याची शक्यता दिसून येत आहे.
विवेक अग्निहोत्री यांना एका मुलाखतीत कंगना रणौतला तुमच्या सिनेमात घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर माझ्या सिनेमांना स्टार्सची गरज नाही, मला अॅक्टर्स हवे आहेत. मी १२ वर्षांपूर्वी सिनेइंडस्ट्रीत माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हाच मी ठरवलं होतं की मला टिपिकल बॉलीवूड स्टार-ड्राईव्हन सिनेमे बनवायचे नाहीत. मला माझ्या पद्धतीनं सिनेमाला ट्रिटमेंट द्यायची आहे, असं विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.
द काश्मीर फाईल्स सिनेमा पाहिल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली होती. द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे की, जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केलं पाहिजे, असं कंगना म्हणाले होती.
‘द काश्मीर फाईल्स’ कोट्यवधीचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या 19 व्या दिवशी म्हणजे काल मंगळवारी ‘द काश्मीर फाईल्स’ने 2.75 कोटींची कमाई केली. त्याआधी सोमवारी 3.10 कोटींना बिझनेस केला. या 19 दिवसांत ‘द काश्मीर फाईल्स’ने एकूण 232.52 कोटींचा बिझनेस केला आहे.
300 कोटींचा पल्ला गाठणं कठीण-
‘द काश्मीर फाईल्स’ अजूनही काही ठिकाणी गर्दी खेचत असला तरी, हा चित्रपट 300 कोटींचा पल्ला गाठू शकणार नाही, असं जाणकारांचं मत आहे. अगदी 275 कोटींचा टप्पा गाठणंही कठीण आहे. अर्थात 232.52 कोटींची कमाई हीच मुळात ‘द काश्मीर फाईल्स’साठी ऐतिहासिक गोष्ट आहे. 25 कोटी बजेट असलेल्या या सिनेमानं 232.52 कोटी कमावून एक इतिहास रचला आहे.