Join us  

"माझे पूर्ण शरीर जळालेले अन् मांसही...", 'परिंदा'च्या शूटिंगदरम्यान नानांसोबत घडली होती मोठी दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 1:13 PM

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी सिनेकारकीर्दीत आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. यातील काही शूटिंगदरम्यान त्यांनी विचित्र अनुभवांचाही सामना केला.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत आतापर्यंत दमदार आणि अविस्मरणीय सिनेमात काम केले आहे. ते अभिनय करताना त्या भूमिकेत स्वतःला सामावून घेतात. जणू ते ती भूमिका जगतात. त्यामुळे अनेकदा त्यांना शूटिंग करताना अडचणींचा सामना करावा लागला होता. एकदा परिंदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते थोडक्यात बचावले होते. आगीचा सीन होता, त्यात ते होरपळून निघाले होते. त्यांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांना जवळपास वर्षभर घरीच बसावे लागले होते. तर सलाम बॉम्बे सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांना चाकू लागला होता. नुकतेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अशा जीवघेण्या शूटबद्दल सांगितले. 

नाना पाटेकर यांना आजही लोक क्रांतीवीर, सलाम बॉम्बे आणि परिंदासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. फार कमी लोकांना माहित असेल की, या सिनेमांमधील बरेच सीन्स रिअल होते आणि ऑन द स्पॉट इम्प्रोवाइज केले होते. नाना पाटेकर यांनी अलिकडेच परिंदा सिनेमाच्या क्लायमॅक्स शूटदरम्यान ते खरोखर भाजल्याचे सांगितले. त्या आगीत त्यांची दाढी, पापण्या आणि त्वचा जळाली होती. ज्यामुळे ते जवळपास १ वर्ष काम करू शकले नव्हते.

नानांनी केला खऱ्या आगीचा सामनापरिंदा सिनेमात नाना पाटेकर यांनी अन्नाची भूमिका केली होती, या भूमिकेला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. खरेतर ही भूमिका आधी जॅकी श्रॉफ करणार होते. या चित्रपटातील क्लायमॅक्स सीनमध्ये नाना पाटेकर यांचे पात्र जळताना दाखवायचे होते. त्यावेळी डिजिटल आग नसल्यावर दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी सेटवर खऱ्या आगीचा वापर केला होता. मात्र या आगीत नाना भाजले आणि काही महिने बेडवर होते.

माझे पूर्ण शरीर जळालेले अन् मांसही बाहेर आलेनाना पाटेकर यांनी याबद्दल द लल्लनटॉपला सांगितले. ते म्हणाले की, परिंदामध्ये जो आगीचा सीन आहे, ज्यात माझे संपूर्ण शरीर जळालेले. मी दोन महिने हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. माझे मांसही बाहेर आले होते. सर्व जळलं होतं. दाढी, मिशा, पापण्या भाजल्या होत्या. सहा महिने असेच होते. खूप मोठा अपघात होता.

'हा अपघात होता, विधू विनोदला मला जाळायचे नव्हते'नाना पाटेकर पुढे म्हणाले, 'मी घेतलेली रिस्क नव्हती, हा अपघात होता. तुम्हाला जळायला किती वेळ लागेल? याला जेमतेम पाच सेकंद लागतात. त्या पाच सेकंदात, मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट जळून गेली. पहिल्या टेकमध्ये आम्ही तीन बादल्या ओतल्या, दुसऱ्यामध्ये आम्ही १४ बादल्या ओतल्या. आग खूप मजबूत होती. तो एक अपघात होता. विधू विनोद चोप्राला मला जाळायचे होते असे नाही.

टॅग्स :नाना पाटेकर