1976 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकणा-या आणि पुढे बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेल्या नफीसा अली यांचा एक जुना फोटो सध्या व्हायरल होतोय. नफीसा अली सध्या कॅन्सरला झुंज देत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले. नुकताच त्यांनी एक जुना फोटो शेअर करत, एक सुंदर आठवण चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या त्यांनी शेअर केलेला हा जुना फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
‘वयाच्या १९ व्या वर्षी फेमिना मिस इंडियाचा ताज जिंकल्यानंतर माझे वडिल अहमद अली यांनी हा फोटो...’,असे कॅप्शन देत नफीसा यांनी हा फोटो शेअर केला आणि बघता बघता तो व्हायरल झाला.
नफीसा यांना तिसऱ्या स्टेजचा कर्करोग आहे. 62 वर्षांच्या नफीसा यांनी अलीकडे सोशल मीडियावर पोस्ट लिहून पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवाय जीवनात काही अघटित होण्यापूर्वी मला माझ्या तिसऱ्या नातवंडाला पाहायचे आहे,अशी भावूक पोस्टही त्यांनी अलीकडे लिहिली होती.
नफीसा अली यांना नफीसा सिंह आणि नफीसा सोधी नावानेही ओळखले जाते. बंगाली अभिनेत्री अशी त्यांची ओळख. पण त्यांनी नफीसा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसह अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे.
जुनून (1979), मेजर साहब (1998), लाइफ इन अ मेट्रो (2007), यमला पगला दीवाना (2010), गुजारिश (2010) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. नफीसा यांनी 1976 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला होता.तर 1977 मध्ये त्या मिस इंटरनेशनलच्या रनरअप राहिल्या होत्या. नफीसा यांनी अर्जुन अवार्ड विजेते सुप्रसिद्ध पोलो प्लेअर कर्नल आरएस सोधी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे.