Join us

कोयला वोयला गिराता था मैं..., ‘झुंड’मधील ‘बाबू’ने सांगितला नागपूरच्या वस्तीतला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 11:23 AM

Jhund Movie : अशी घडली झुंड चित्रपटाची टिम...नागराज यांनी कोळशाच्या खाणीतून हिरे शोधावे, तसे वस्तीतून या पोरांना शोधलं आणि त्यांना कॅमेऱ्यापुढे उभं केलं. बाबू हा त्यापैकीचं एक. 

‘झुंड नहीं टीम कहिये’ अशी टॅग लाईन असलेला दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) ‘झुंड’ (Jhund Movie )हा पहिला वहिला हिंदी सिनेमा आज 4 मार्चला चित्रपटगृहांत दाखल झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, साऊथचा सुपरस्टार धनुष असे सगळे या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. अमिताभ यांच्या अभिनयाला तोड नाहीच. या चित्रपटात काम केलेल्या नवख्या पोरांनीही अप्रतिम अभिनय केला आहे. नागराज यांनी कोळशाच्या खाणीतून हिरे शोधावे, तसे वस्तीतून या पोरांना शोधलं आणि त्यांना कॅमेऱ्यापुढे उभं केलं. बाबू हा त्यापैकीचं एक. 

होय, ‘झुंड’मध्ये बाबूची भूमिका साकारणारा प्रियांशू क्षत्रिय (Priyanshu Kshatriya) हा मुलगा ट्रेनमधून कोळसा पाडणारा पोरगा. तो नागराज यांच्या सिनेमात झळकला. त्याला ही भूमिका कशी मिळाली? हे त्याने सांगितलं आहे.‘झुंड’च्या टीमने नुकतीच ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या झी मराठीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी  बाबू नावाचे पात्र साकारलेल्या प्रियांशू क्षत्रिय याने त्याला हे काम कसे मिळाले, याबद्दलचा किस्सा सांगितला. 

 रेल्वे ट्रॅकजवळ वस्ती अन् नागराज यांची एन्ट्रीप्रियांशूने सांगितलं,‘  नागपुरात रेल्वेच्या ट्रॅकजवळच आमची वस्ती आहे. आमचं लहानपण तिथेच गेलं आहे. मी ट्रेनमधून कोळसा पाडायचो आणि माझी टीम आम्ही तो गोळा करून विकायचो. एकदिवस ट्रेनमधून कोळसा पाडत असतानाच दादाची (नागराज मंजुळे) यांची कारमधून एन्ट्री झाली. मी म्हटलं, चला पळा रे... पोलिस आलेत... पण ते कारमधून उतरले... त्यांच्याकडचा कॅमेरा वगैरे पाहून हे तर पोलिसवाले नाहीत तर न्यूजवाले आहेत, असं मी मनात म्हणालो. त्यांनी कॅमेरा काढला अन् वस्तीत कॅमेरा फिरवता फिरवता, त्यांचा कॅमेरा आमच्यावर रोखला गेला.  हळूच त्यांनी कॅमेरा आमच्याजवळ वळवला.हे सगळं काय आहे, असं मी त्यांना विचारलं. तर अरे, आमचा प्रोजेक्ट सुरू आहे, असं ते  म्हणाले. मी जरा तावात त्यांना म्हणालो, तुमचं प्रोजेक्ट वगैरे चालू द्या, पण आमच्या वस्तीचं नावं यात टाकायचं नाही. आमच्या वस्तीचं नाव खराब व्हायला नको. ही वस्ती माझी आहे.... यावर ते हसू लागलं. मग त्यांनी चित्रपटासाठी विचारणा केली, असा किस्सा प्रियांशूनं सांगितला.

‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.  या चित्रपटात अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :झुंड चित्रपटनागराज मंजुळेअमिताभ बच्चनसिनेमा