झुंड या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यापूर्वीच नागराज मंजुळे यांना बसला हा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 7:00 AM
सैराट या चित्रपटाची चर्चा केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील झाली होती. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या ...
सैराट या चित्रपटाची चर्चा केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील झाली होती. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक नागाराज मंजुळे यांचे तर या चित्रपटांमुळे प्रचंड कौतुक झाले होते. नागरा यांचा सैराटच्या आधी प्रदर्शित झालेला फँड्री देखील लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटामुळे नागराज यांचे नाव मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील सगळ्यांच्या परिचयाचे झाले आहे. आता नागराज एका हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे आणि या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असणार आहेत. पण या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्यापूर्वीच नागराज मंजुळे यांना एका मोठा धक्का बसला आहे. अमिताभ बच्चन आता नागराजच्या झुंड या हिंदी चित्रपटाचा भाग नसणार असल्याची बातमी एका वर्तमानपत्राने दिली आहे. नागराज मंजुळे फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर एक चित्रपट बनवत असून या चित्रपटात अमिताभ मुख्य भूमिका साकारणार होते. पण त्यांनी या चित्रपटाला रामराम ठोकला असल्याची बातमी मुंबई मिरर या वर्तमानपत्राने दिली आहे. नागराज यांच्या या चित्रपटात काम करण्यासाठी अमिताभ यांनी गेल्या वर्षीच होकार दिला होता. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे वेळापत्रक सतत बदलत असल्याने अमिताभ यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. अमिताभ हे त्यांच्या इतर चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. त्यांनी पुढील तारखा या त्यांच्या अन्य चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्या आहेत. त्यामुळे नागराजच्या चित्रपटाला आता तारखा देणे त्यांच्यासाठी शक्य नाहीये. त्यामुळे अमिताभ यांनी या चित्रपटासाठी त्यांना देण्यात आलेली साइनिंग अमाऊंट देखील परत केली असल्याचे म्हटले जात आहे. झुंड या चित्रपटाच्या कथेच्या हक्कावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा सतत बदललल्या जात असल्याची चर्चा आहे. Also Read : झी टॉकीजवर लवकरच ‘सैराटच्या नावानं चांगभलं’