40 आणि 50 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री नलिनी जयवंत यांची आज पुण्यतिथी आहे. 2010 मध्ये नलिनी यांनी या जगाचा निरोप घेतला.सहजसुंदर अभिनय, बोलके डोळे आणि अस्सल सौंदर्य लाभलेली नलिनी मूळच्या मराठी. 18 फेब्रुवारी 1936 रोजी जन्मलेली नलिनी ही अभिनेत्री नूतनची आई शोभना समर्थ यांची चुलत बहीण.
नलिनने बालकलाकार म्हणून फिल्मी करिअरची सुरुवात केली आणि पुढे दमदार अभिनयाच्या जोरावर लवकरच तिला मुख्य नायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. मेहबूब खान यांचा ‘बहन’ हा तिचा पहिला सिनेमा समजला जातो. पण तिला खरी ओळख दिली ती ‘अनोखा प्यार’ या 1948 साली प्रदर्शित सिनेमाने. यानंतर नलिनी आघाडीची नायिका बनली. अगदी मधुबाला, नरगिसच्या तोडीची.
त्याकाळी प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक तिच्यासोबत काम करायला उत्सुक होता. त्यामुळे नलिनीकडे कामाची कमी नव्हतीच. पण आयुष्याच्या अखेरच्या काळात असे काही झाले की, तिला ना कुटुंबाची साथ मिळाली, ना फिल्म इंडस्ट्रीची.
1965 साली रिलीज झालेला ‘बॉम्बे रेड कोर्स’ हा तिचा शेवटचा सिनेमा. यानंतर नलिनी जणू चित्रपटांतून गायब झाली. पुढे पुढे तर गायबच झाली. चेंबूरमधील तिच्या घराबाहेर ती क्वचित दिसू लागली आणि 22 डिसेंबर 2010 रोजी तिने शेवटचा श्वास घेतला. नलिनीच्या मृत्यूची भणक कोणालाच लागली नाही. तीन दिवस तिचा मृतदेह घरात पडून होता. एका गाजलेल्या, ऐश्वर्य भोगलेल्या अभिनेत्रीचा हा दु:खद अंत पाहून प्रत्येकजण हळहळला होता.