1993 साली मिस इंडिया होत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar). जब प्यार किसी से होता हैं या सिनेमातून नम्रताने कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता प्रचंड लोकप्रिय झाली. या सिनेमानंतर तिने वास्तव, कच्चे धागे यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे मोजक्या चित्रपटांमध्ये काम करुनही तिने मोठी लोकप्रियता मिळवली. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना नम्रताने दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. त्यामुळे महेश बाबूच्या सांगण्यावरुन तिने इंडस्ट्रीला रामराम केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडतो. या प्रश्नाचं नम्रताने एका मुलाखतीत उत्तर दिलं.
नम्रता आणि महेश बाबू यांच्या लग्नाला जवळपास १७ वर्ष झाली आहेत. मात्र, त्यानंतरही नम्रताने अद्यापही कलाविश्वात अभिनेत्री म्हणून पुर्नपदार्पण केलेलं नाही. याविषयी बोलत असताना हा सर्वस्वी माझा निर्णय होता असं तिने म्हटलं.
"मॉडलिंगनंतर मी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मी माझं काम एन्जॉय करायला किंवा ते सिरिअसली घ्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हाच माझी भेट महेशसोबत झाली. आणि, आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, जर आज मी माझ्या कामाला अधिक महत्त्व दिलं असतं तर माझं आयुष्य खूप वेगळं असतं. मी याविषयी तक्रार करत नाहीये. पण, ज्या दिवशी माझं महेशसोबत लग्न झालं तो दिवस माझ्या आयुष्यातील बेस्ट दिवस होता. त्या दिवसानंतर माझं सगळं आयुष्य बदलून गेलं", असं नम्रता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "लग्न करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. आई होणं, ते आईपण अनुभवणं हा सुंदर अनुभव होता. मला वाटत नाही या गोष्टींचा आनंद मला दुसऱ्या कशात मिळेल. मी प्रचंड आळशी होते. मी कधीच कोणत्या गोष्टीचे प्लॅन तयार केले नव्हते. जे काही घडलं ते आपोआप घडत गेलं. पण, मी त्यावेळी जो काही निर्णय घेतला तो योग्य होता आणि त्यात मी खूश आहे. मी कलाविश्वात आले तेव्हाही आळशी होते. त्यामुळेच मी मॉडलिंग सोडून अभिनयाकडे वळले होते."
दरम्यान, नम्रता आणि महेश बाबू यांची पहिली भेट २००० साली वामसी सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर एकमेकांना ते डेट करु लागले. २००५ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिने कलाविश्वातून स्वत: काढता पाय घेतला आणि ती घरसंसारात रमली. सध्या नम्रता घरासोबतच तिचं करिअरही घडवत आहे. ती सध्या निर्माती म्हणून काम करत आहे. २०२२ मध्ये आलेल्या मेजर सिनेमाची निर्मिती तिने केली होती.