मराठीतील काही मोजक्याच कलाकारांनी बॉलिवूडमध्येही जम बसवला. हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मराठी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे नाना पाटेकर. कॉमेडी, गंभीर , खलनायक अशा सगळ्याच भूमिकांमध्ये ते प्रेक्षकांना भावले. सिनेसृष्टीतील करिअरबरोबरच नाना त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत होते. तनुश्री दत्तानेनाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले होते. यावर आता सहा वर्षांनी मौन सोडत नाना पाटेकरांनी भाष्य केलं आहे.
नाना पाटेकरांनी नुकतीच 'लल्लनटॉप' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अभिनयातील करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केलं. यावेळी तनुश्री दत्ताने मीटू मोहिमेतून केलेल्या आरोपांवरही नाना पाटेकरांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, "मला माहीत होतं की हे आरोप चुकीचे आहेत. म्हणून मला कधीच राग आला नाही. सगळे आरोप खोटे होते, तर मला राग का येईल? आणि या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. त्या घडून गेल्या आहेत. त्याबद्दल आता आपण काय बोलू शकतो? सगळ्यांना सत्य माहीत होतं. मी तेव्हा हे सांगू शकलो असतो. कारण, असं काही घडलंच नव्हतं. अचानक कोणीतरी येऊन म्हणतं की तू हे केलंस ते केलंस...मी याला काय उत्तर देऊ? मी काहीच नाही केलं, हे मी सांगायला हवं होतं का? पण, मला माहीत होतं की मी काहीच केलेलं नाहीये".
तनुश्री दत्ताचे आरोप
२०१८ मध्ये Me Too मोहिमेअंतर्गत तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गंभीर आरोप केले होते. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नानांनी लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. नानांबरोबरच तिने विवेक अग्निहोत्री आणि गणेश आचार्य यांच्यावरही आरोप केले होते. सिनेमातील गाण्यात केवळ एकच कलाकाराचं काम होतं. पण, तरीदेखील नाना दिवसभर शूटिंग सेटवर हजर होते, असं अभिनेत्री म्हणाली होती.