Join us

नाना पाटेकरांना रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' बघायची इच्छा नव्हती, म्हणाले- "अनिल कपूरमुळे मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:21 IST

नाना पाटेकरांनी एका मुलाखतीत रणबीर कपूर - अनिल कपूर यांच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमाबद्दल त्यांचं मत मांडलंय (nana patekar, anil kapoor, animal, vanvas)

नाना पाटेकर त्यांच्या आगामी 'वनवास' सिनेमामुळे चर्चेत आहेत. नाना यांचा अनेक महिन्यांनी बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका असलेला 'वनवास' सिनेमा येतोय. पुढील महिन्यात हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकरांनी त्यांचा इंडस्ट्रीतील खास मित्र अनिल कपूरसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. त्यावेळी नाना यांनी २०२३ मध्ये अनिल अन् रणबीर कपूर यांच्या गाजलेल्या 'अ‍ॅनिमल' सिनेमाबद्दल त्यांचं मत मांडलंय.

नाना पाटेकर 'अ‍ॅनिमल' सिनेमाबद्दल काय म्हणाले?

नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या गप्पांची मुलाखत युट्यूबवर रिलीज झालीय. या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी अनिल कपूर यांच्या 'अ‍ॅनिमल'बद्दल त्यांचं मत मांडलंय. नाना म्हणाले, "मी 'अ‍ॅनिमल' सिनेमा पाहून अनिलला फोन केला आणि म्हणालो होतो की, मी 'अनिल-मल' हा सिनेमा पाहिलाय.  त्या सिनेमात एकटा अनिलच होता ज्याचा अभिनय मला संयत वाटला. बाकी सर्वांचे परफॉर्मन्स हाय नोटवर होते. मी आधी हा सिनेमा बघणार नव्हतो.  परंतु अनिलने चांगलं काम केलंय असं मित्र म्हणाले. मला याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही." 

नाना पाटेकरांच्या 'वनवास'ची उत्सुकता

'गदर' आणि 'गदर २'चे डायरेक्टर अनिल शर्मा यांनी 'वनवास'च्या दिग्दर्शनाच्या धुरा सांभाळणार आहे. या सिनेमात नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय या सिनेमात नानांसोबत उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. २० डिसेंबरला 'वनवास' सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होतोय. नाना पाटेकरांना नव्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर बघायला त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

 

टॅग्स :नाना पाटेकरअनिल कपूरबॉलिवूडरणबीर कपूर