गेल्या काही दिवसांपासून अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत खासगी आयुष्यासोबत सिनेकारकीर्दीतील अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या गाजलेल्या सिनेमातील काही रंजक आणि विचित्र किस्से देखील सांगितले आहेत. परिंदाच्या आगीच्या शूटदरम्यान ते जळले होते आणि वर्षभर इंडस्ट्रीतून गायब असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांनी दिग्दर्शित केलेला प्रहार (Prahaar Movie)चित्रपटाचा किस्सा सांगितला आहे.
नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेला प्रहार चित्रपट आजही लोकप्रिय आहे. हा चित्रपट आजही लोक तितक्याच आवडीने पाहतात. लल्लनटॉप या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रहार चित्रपटातील किस्सा सांगितला. ते म्हणाले की, 'परिंदा' चित्रपटानंतर 'प्रहार'ची जुळवाजुळव सुरू केली. मलादेखील आर्मीत जायचे होते आणि ही अपूर्ण इच्छा प्रहार या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण केली. या चित्रपटात सई परांजपे यांचा मुलगा गौतम जोगळेकर मुख्य भूमिकेत आहे. तो सिनेमाटोग्राफर देबू देवधर यांचा अस्टिस्टंट होता. त्याला मी पीटर डिसूझा या भूमिकेसाठी निवडले. त्यावेळी देबूने म्हटले की त्याला व्यवस्थित बोलता येत नाही. पण, मी त्याला सांगितले की मला असाच अभिनेता हवाय. त्याने खूप चांगले काम केले. अरूण जोगळेकरने दिग्दर्शित केलेला पक पक पकाक सिनेमात मी काम केले होते.
६० फूट उंचीवरून चालायचे होते आणि...
प्रहार हा चित्रपट ऑथेंटिक झाला होता. त्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये असलेले सुनिल देशपांडे यांनी मदत केली होती. त्याशिवाय, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह हे त्यावेळी कमांडो विंगमध्ये होते. त्यांनीदेखील सहकार्य केले. प्रहार चित्रपटात असलेल्या आर्मी ट्रेनिंग दरम्यानच्या शूटिंगचा किस्सा नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले की, आपल्याला पाय ठेवण्यासाठी दोन इंचाची जागेची गरज असते. त्या प्लॅटफॉर्मवर साधारणपणे चार इंचाची जागा होती. त्या सीनमध्ये खाली पाहिले की भीती वाटायची. पण फक्त पायाकडे लक्ष दिल्यास चालता यायचे. त्या आर्मी ट्रे्निंगच्या शूटच्या वेळी ६० फूट उंचीवरून चालायचे होते. त्यावेळी अभिनेता शिव सुब्रम्हण्यम या कलाकाराला उंचीची भीती वाटत होती. त्यात त्याने खाली पाहिल्यामुळे आणखीच घाबरला. त्यावेळी भीतीने त्याची पँट ओली केली आणि रडू लागला होता.