अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) सिनेमामुळे चर्चेत आहेत. बऱ्याच दिवसांनी नाना मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलर लाँचप्रसंगी नाना पाटेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेलं एक विधान थेट 'गदर 2'वर निशाणा साधणारं होतं. बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणारा एक सिनेमा नुकताच पाहिला. मात्र तो संपेपर्यंत बघण्याचे पेशन्स माझ्यात नव्हते. मी पूर्ण पाहिलाच नाही. हल्ली असेच सिनेमे बनवले जातात आणि लोकांना बळजबरीने पाहायला लावतात अशीही टीका त्यांनी केली.
नाना पाटेकर कोणत्याही सिनेमाचं नाव न घेता म्हणाले,'सध्या असे चित्रपट येत आहेत जे बळजबरीने प्रेक्षकांना बघायला लावले जातात. आताच एक सिनेमा आलाय तुम्हाला मुलाला अभिनेता बनवायचे आहे मग भलेही त्याला अभिनय करताच येत नसेल तरी तुम्ही त्याला प्रेक्षकांवर थोपवत आहात. ५-१० सिनेमांनंतर प्रेक्षक त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतील आणि त्याला स्वीकारायला लागतील. आजकाल सिनेमांबाबतीत हेच घडत आहे.'
ते पुढे म्हणाले, 'जेव्हा द व्हॅक्सीन वॉर सारखे चित्रपट येतात तेव्हा लोकांना दोन्ही सिनेमांमधला फरक समजतो. चांगला आणि वाईट सिनेमांमधलं हे अंतर आहे.' नानांनी कोणत्याही सिनेमाचं नाव घेतलं नाही मात्र त्यांचा निशाणा अनिल शर्मा यांच्या 'गदर 2'वर होता हे स्पष्ट कळतं.
'गदर 2'शी खरं तर नाना पाटेकर यांचंही नातं आहे. नानांनी 'गदर 2' मध्ये सुरुवातीला आवाज दिला आहे. तर ओम पुरी यांनी २००० साली आलेल्या 'गदर:एक प्रेम कथा' मध्ये आवाज दिला होता.