नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अभिनेते आहे, ज्यांनी फक्त आपल्या आवाजाच्या आणि संवाद फेकीच्या कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. फक्त अभिनयाच्या जोरावर ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते ठरले. नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुकतेच त्यांनी केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स्वात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मनातील एक खंत व्यक्त केली.
आजपर्यंत नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमे केले आहेत. पण, त्यांनी आतापर्यंत मल्याळम मनोरंजनसृष्टीत काम केले नाही. मल्याळम मनोरंजनसृष्टीत काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, गेल्या पाच दशकांत मला मल्याळम मनोरंजनसृष्टीत काम करण्याची एकही संधी मिळालेली नाही. गेल्या 50 वर्षांत केरळमधील एकाही दिग्दर्शकाने मला सिनेमासाठी संपर्क केलेला नाही. एकंदरीतच अभिनेता म्हणून माझ्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. मी खूप प्रयत्न करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही'.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स्वात ते म्हणाले, 'केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मला आमंत्रित केल्याबद्दल आणि माझा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे आभार. 32 वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या शूटिंगसाठी मी पहिल्यांदा केरळला आलो होतो. केरळच्या सामाजिक-राजकारण परस्थितीत काहीही बदललेलं नाही. येथील लोक मनाने विचार करतात. त्यामुळेच भाषा वेगळ्या असल्या तरी बोलणं सोपं होतं. हे असंच व्हायला हवे. केरळसारखे लोक सर्वत्र असायला हवेत'.
नाना पाटेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटात दिसले होते. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट कोरोना काळात शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या स्वदेशी लस निर्मितीवर आधारित आहे.