सध्या सोशल मीडियावर जंगली रम्मी आणि ऑनलाइन गेम्स यांच्या अनेक जाहिराती पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे अनेक बॉलिवूड कलाकार या जाहिराती करत असल्यामुळे तरुणवर्ग या ऑनलाईन गेम्सकडे आकर्षित होत आहे. इतकंच नाही तर या गेम्समुळे अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळही आली आहे. त्यामुळे नांदेडमधील एका तरुणाने चक्क अभिनेता अजय देवगण (ajay devgan) याला पत्र लिहिलं आहे. सध्या अजय जंगली रम्मीची जाहिरात करत आहे. त्यामुळे त्याला उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलं आहे.
नांदेडमधील मुखेड तालुक्यात असलेल्या वसुर या गावातील विलास शिंदे या तरुणाने अजयसाठी पत्र लिहिलं आहे. विलासने २० जून रोजी स्पीड पोस्टाने अजयच्या जुहू येथील पत्त्यावर हे पत्र पाठवलं.
नेमकं काय लिहिले आहे पत्रात?
महोदय अभिनेता देवगन सर नमस्कार आणि राम राम.. आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात. आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची आणि तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खुप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्याने सोशल मीडियावर केलं पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहिरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जणू सवयच लागली.
याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की, आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. जाहिरातीचा उद्देश काय आहे, हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितलं पाहिजं. नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व सांगितलं पाहिजे. ह्याच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे.
हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहिले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरुणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहिराती करून नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितलं पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा आणि आपण ही जाहिरात बंद करावी. तसेच नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.
दरम्यान, या तरुणाने त्याच्या फेसबुकवरही हे पत्र शेअर केलं आहे. त्यामुळे त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी त्याला पाठिंबाही दिला आहे.