नंदिता दास आणि प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांच्या दोन्ही दिग्गजांच्या चाहत्यांची प्रतीक्षा आज शुक्रवारी संपली. मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेला नंदिता दास दिग्दर्शित ‘मंटो’ प्रदर्शित झाला. या चित्रपटावर नंदिता दास अनेक वर्षांपासून काम करत होती. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचा मॉर्निंग शो रद्द करण्यात आल्याने नंदिता दुखावली गेली. तिने ट्विटरवर आपला संताप बोलून दाखवला.
सआदत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिर्द्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतरही साहित्य लिहिले.