आपल्या विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा आगामी 'झ्विगॅटो' (Zwigato) या सिनेमात दिसणार आहे. सामान्य माणसाचं संघर्षपूर्ण आयुष्य त्याने पडद्यावर मांडलं आहे. हसवत हसवत त्याने प्रत्येकालाच रडवलंही आहे. पण अशा गंभीर भूमिकेसाठी विनोदवीर कपिल शर्माची (Kapil Sharma) निवड का केली असावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हाच प्रश्न स्वत: कपिललाही पडला होता. तेव्हा त्याला सिनेमाच्या दिग्दर्शिका नंदिता दास (Nandita Das) यांनी दिलेलं उत्तर इंटरेस्टिंग आहे.
'मंटो' फेम दिग्दर्शिका, अभिनेत्री नंदिता दास हिने 'झ्विगॅटो' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सिनेमाची दखल घेण्यात आली आहे. झ्विगॅटोमध्ये कपिल शर्माने डिलिव्हरी बॉयचे पात्र साकारले आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर लॉंच पार पडला. यावेळी ही भूमिका कशी मिळाली यावर कपिल म्हणाला, 'मी आधीपासूनच नंदिता यांचा चाहता आहे. तुम्ही एखाद्याच्या कामाने प्रभावित असता तेव्हा त्या माणसावर तुम्ही आपोआप विश्वास ठेवता. त्यांच्याकडे विशिष्ट काम असते. एकाच वर्षात दोन तीन सिनेमे करण्यासारखे नाही. मला हा सिनेमा मिळणं ही माझ्यासाठी मोठी संधी होती कारण लोक मला गंभीरतेने घेत नाहीत. माझी बायको अगदी वडीलही मला गांभीर्याने घेत नाहीत. जेव्हा मला सिनेमा ऑफर झाला तेव्हा मीही विचारले की, मीच का?' तर त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं ज्याने मीच विचारात पडलो.
कपिलच्या या प्रश्नावर दिग्दर्शिका नंदिता दास म्हणाली,' या सिनेमासाठी शाहरुखने जरी होकार दिला असता तरी मी त्याला घेतलं नसतं. तुझा चेहरा सामान्य व्यक्तीसारखा आहे ना की मोठ्या सेलिब्रिटी सारखा. मला माझंच पात्र त्यात सापडलं म्हणून या भूमिकेसाठी तुझी निवड केली.'
नंदिताचं हे उत्तर ऐकून कपिल म्हणाला, 'तिने दिलेलं उत्तर ऐकून खरं तर मला समजलेच नाही की ही नक्की माझी स्तुती आहे की आणखी काही.'
Nandita Das : सावळेपणामुळे अभिनयापासून गेली दूर, 'मंटो' फेम नंदिता दासने व्यक्त केली खंत
'झ्विगॅटो' सिनेमा अनेक आंतररष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखवण्यात आला आहे. कपिलच्या चाहत्यांना आता सिनेमाची उत्सुकता आहे.