अभिनय असो वा सौंदर्य नर्गिसला तोड नाही़ 50-60 च्या दशकात या अभिनेत्री गाठलेली उंची आजपर्यंत कुणालाही गाठता आलेली नाही. नर्गिस आपल्या चित्रपटांसोबत आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. आज त्यांना आठवण्याचे कारण म्हणजे, 1981 साली आजच्या दिवशी (3 मे) नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला होता. कॅन्सरने नर्गिस यांची प्राणज्योत मालवली होती.
दिग्दर्शक मगबूब खान यांना त्यांच्या तकदीर या सिनेमासाठी हिरोईन हवी होती. या चित्रपटासाठी 14 वर्षांची नर्गिस आॅडिशनसाठी उभी झाली, नर्गिस यांनी डायलॉग्स वाचले आणि काय आश्चर्य सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांनी मान्य केले, की नर्गिसच सिनेमाची हिरोईन होणार आणि त्यावेळी नर्गिस यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.
एकेकाळी नर्गिस व राज कपूर यांची लव्हस्टोरी खूप गाजली होती. मात्र नर्गिस व सुनील दत्त यांचे नाते, त्यांची लव्हस्टोरीही कमी सुंदर नव्हती. सुनील दत्त नर्गिस यांच्यावर अतोनात प्रेम करत. या प्रेमाने नर्गिस यांनाही जिंकले आणि दोघेही कायमचे एकमेकांचे झाले होते.
१९५७ साली साली सुनील दत्त व नर्गिस यांनी ‘मदर इंडिया’ या सिनेमात एकत्र काम केले. हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान हिट झाला. याच सिनेमाच्या सेटवर सुनील दत्त यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचे प्राण वाचवले आणि त्यांच्यातील लव्हस्टोरी बहरायला लागली. त्यानंतर वर्षभरातच दोघांनी लग्न केले.
नर्गिसवर सुनील दत्त यांचे प्रचंड प्रेम होते. सुनील दत्त बाहेर कुठेही गेलेत की, नर्गिस यांच्यासाठी साडी आणायचे. पण सुनील यांनी आणलेली एकही साडी नर्गिस कधी नेसल्या नाहीत. कारण पतीने आणलेली एकही साडी त्यांना आवडली नाही.
मुलगा संजय दत्तचा पहिला सिनेमा बघण्याची नर्गिस यांची खूप इच्छा होती. पण संजयचा ‘रॉकी’ सिनेमा रिलीज होण्याच्या चार दिवस आधीच नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला. लेकाच्या पहिला चित्रपट पाहण्याची नर्गिस यांची इच्छा अधुरी राहिली. पण ‘रॉकी’च्या प्रीमिअरवेळी त्यांच्या नावाची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.